जयपूर: राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी आयोजित केलेल्या गौरव यात्रेवर दगडफेक झाल्याचे वृत्त आहे. एकूण ५८ दिवसांच्या या यात्रेचा आज दुसरा दिवस आहे. दरम्यान, दुसऱ्याच दिवशी त्यांना जोधपूरध्ये लोकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. पीपाड येथे त्यांच्या यात्रेवर रात्री उशीला दगडफेक झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राजस्थानमधील जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. याच पार्श्वभूमिवर भाजपही कामाला लागला असून, गौरव यात्रा हासुद्धा त्याचाच भाग असल्याचे बोलले जात आहे.


मुक्कामाचे ठिकाण बदलले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, झालेल्या दगडफेकीत वसुंधरा राजे यांच्या ताफ्यातील वाहनांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी तर, अशोक गहलोत यांच्या नावाने घोषणाबाजी करण्यात आली. मात्र, या घटना घडल्या असल्या तरी, वसुंधरा राजे यांनी सर्व सभांना उपस्थिती लावली. तसेच, त्या सभांमध्ये भाषणेही केली. दरम्यान, रात्रीचा मुक्काम खजडला न करता त्या थेट जयपूरला रवाना झाल्या.


कुठे घोषणाबाजी तर, कुठे काळे झेंडे दाखवून विरोध


दरम्यान, रक्षाबंधनाच्या सणाचे कारण देत पुढचे ३ दिवस यात्रा स्थगित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ओसिया येथे काळे झेंडे दाखवून तर, देचू येथे घोषणाबाजी करून वसुंधरा राजेंना विरोध करण्यात आला. दुसऱ्या बाजूला शेरगढमध्ये काही जणांनी त्यांचे पोस्टर फाडले. तर भोपालगड विधासभा क्षेत्रातील बावडी येथे सभेच्या आधी त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.