Success Story: कोण म्हणतं लग्नानंतर स्वप्न अपूर्ण राहतात? एकदा IPS तनुश्रींची कहाणी वाचाच!

IPS TanuShree Success Story: तनुश्री यांनी लग्नानंतर आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम केले आणि आयपीएस अधिकारी बनल्या.

Pravin Dabholkar | Updated: Mar 21, 2025, 07:59 PM IST
Success Story: कोण म्हणतं लग्नानंतर स्वप्न अपूर्ण राहतात? एकदा IPS तनुश्रींची कहाणी वाचाच!
आयपीएस तनुश्री

IPS TanuShree Success Story: महिलांनी घर सांभाळणे आणि लग्नानंतर नोकरी सोडणे ही काही वर्षांपूर्वीपर्यंत सामान्य गोष्ट मानली जायची. पण अनेक महिलांनी आपल्या कर्तुत्वाने ही विचारसरणी बदलली. त्यांनी कुटुंब आणि करिअरमध्ये उत्तम संतुलन निर्माण करून यश मिळवले आणि समाजाचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. अशा महिला लाखो तरुणांसाठी प्रेरणा बनतात.  आयपीएस तनु श्री यापैकीच एक आहेत. ज्यांनी लग्नानंतरही आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम केले आणि आयपीएस अधिकारी बनल्या.

लग्नानंतरही स्वप्ने सोडले नाही

तनुश्री यांचे लग्न 2015 झाले. लग्नानंतर महिलांवर सासरच्या घरची जबाबदारी येते. यात त्यांना आपले स्वप्न बाजूला ठेवावे लागते. पण तनुश्री आपले स्वप्न विसरल्या नव्हत्या. त्यांनी घरातील जबाबदाऱ्या पार पाडताना सोबत यूपीएससीची तयारी सुरू ठेवली. कठोर परिश्रम घेतले. 2016 मध्ये यूपीएससी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले. 2017 मध्ये त्या आयपीएस अधिकारी बनल्या. तनुश्री या 2017 च्या एजीएमयूटी कॅडरच्या बॅचच्या अधिकारी आहेत आणि त्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील शोपियान येथे एसएसपी (वरिष्ठ पोलिस अधीक्षक) म्हणून काम केले आहे. सध्या त्या काश्मीरमधील राज्य तपास संस्थेत (SIA) एसपी म्हणून कार्य बजावत आहेत.

लहानपणापासूनच अभ्यासात हुशार

तनुश्रीचा यांचा जन्म 24 एप्रिल 1987 रोजी बिहारमधील मोतीहारी येथे झाला. त्यांनी बोकारो येथील डीएव्ही पब्लिक स्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांचे वडील सीआरपीएफमध्ये डीआयजी होते. त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच शिस्त आणि देशसेवेची प्रेरणा मिळाली. तनुश्री यांनी दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेजमधून इतिहासात (ऑनर्स) पदवी प्राप्त केली आणि तेव्हापासून स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली.

आधी असिस्टंट कमांडंट मग आयपीएस

तनुश्री यांनी 2014 मध्ये सीआरपीएफमध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी आयकर विभागाची परीक्षाही उत्तीर्ण केली पण पोस्टिंग घेतली नाही. त्यांचे खरे स्वप्न आयपीएस अधिकारी होण्याचे होते. कठोर परिश्रम आणि समर्पणाच्या जोरावर त्यांनी ते पूर्ण केले.

मोठ्या बहिणीकडून घेतली प्रेरणा 

तनुश्री यांना आयपीएस होण्याची प्रेरणा त्यांची मोठी बहीण मनूश्री यांच्याकडून मिळाली. मनुश्री या सीआरपीएफमध्ये कमांडंट आहे. मनुश्री यांनी प्रत्येक पावलावर तनुश्री यांना प्रोत्साहन दिले आणि मार्गदर्शन केले.

सोशल मीडियावरही लोकप्रिय 

आयपीएस तनु श्री केवळ त्यांच्या कामातच नव्हे तर सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहेत. इन्स्टाग्रामवर त्यांचे 1.5 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. जिथे त्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याशी संबंधित अपडेट्स शेअर करतात. तरुणाई आणि विशेषतः महिला वर्ग तनुश्री यांना आपले प्रेरणास्थान मानतात.