Success Story: केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच युपीएससीचे निकाल आल्यानंतर देशभरातील भावी आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांनी कशाप्रकारे संघर्ष करत यश मिळवलं याच्या गोष्टी, किस्से व्हायरल होत असतात. यामधील काही संघर्ष हे फारच कठोर असतात, जे पाहिल्यानंतर आपल्यालाही वेदना होतात आणि लढण्यासाठी बळ मिळतं. बिहारच्या रवी राज यांचा संघर्षही असाच आहे. अंध असतानाही त्यांनी स्वप्न पाहणं सोडलं नाही आणि यशाला गवसणी घातली. त्यांच्या यशात त्यांच्या आईने मोलाची भूमिका निभावली. आपल्या मुलाला आयएएस अधिकारी करुनच त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
बिहारमधील नवादा जिल्ह्यातील माहुली गावातील रवी राज यांनी 2024 च्या यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत 182 वा क्रमांक मिळवला आहे. शेतकरी रंजन कुमार सिन्हा आणि गृहिणी विभा सिन्हा यांच्या पोटी जन्मलेल्या रवी यांच्या आईने अंधत्वाचा कधीही त्यांच्यावर परिणाम होऊ दिला नाही. आई त्यांची मार्गदर्शक बनली. त्या मुलाला मोठ्याने पुस्तकं वाचून दाखवत असतं आणि त्याची उत्तरं लिहून ठेवत असतं. घरातील कामं करताना त्या रवीसाठी युट्यूबवरून नोट्सही बनवायच्या.
यूपीएससी उत्तीर्ण होण्यापूर्वी, रवी यांनी 2023 मध्ये 69 वी बीपीएससी परीक्षा 490 व्या क्रमांकाने उत्तीर्ण केली होती. यानंतर त्यांची महसूल अधिकारी पदासाठी निवड झाली. तथापि, चांगली सरकारी नोकरी असूनही, त्यांनी आपली तयारी सुरू ठेवली आणि नव्या जोमाने यूपीएससी परीक्षेला सामोरे गेले. या संपूर्ण प्रवासात कुटुंबाने त्यांना प्रत्येक पावलावर साथ दिली. त्यांच्या आईने विशेषतः सामाजिक अडथळे आणि शैक्षणिक आव्हानांवर मात करण्यास मदत केली.
रवी यांची यशोगाथा केवळ एका विद्यार्थ्याची नाही तर एका आई आणि मुलाच्या अतूट भागीदारी आणि संघर्षाची देखील आहे. विभा त्यांच्या अंध मुलासाठी डोळे झाल्या आणि वाचन, लेखन आणि समजण्याच्या प्रत्येक टप्प्यावर आधार दिला. माध्यमांशी बोलताना रवी म्हणाले, 'माझ्या यशात माझ्या आईचाही तितकाच वाटा आहे. मी काहीतरी करू शकेन म्हणून तिने तिचं आयुष्य एका विद्यार्थ्यासारखे जगले". आज, रवी त्यांच्या यशोगाथेने लाखो उमेदवारांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत.