सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला पुन्हा फटकारले; आदेश डावलल्याने सरन्यायाधीश संतप्त
यापुढे कधीही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करू नका, अशी सक्त ताकीद सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी दिली.
नवी दिल्ली: केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीबीआय) माजी हंगामी प्रमुख नागेश्वर राव यांना गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने फटकारले. नागेश्वर राव यांनी मुझफ्फरपूर शेल्टर बलात्कार प्रकरणाचे तपास अधिकारी ए.के. शर्मा यांची बदली केली होती. ही बदली करताना सर्वोच्च न्यायालयाची परवानगी घेण्यात आली नव्हती. हे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन आहे. आम्ही ही गोष्ट अत्यंत गांभीर्याने घेतली आहे. तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलला आहे. आता देवच तुमची मदत करेल. यापुढे कधीही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करू नका, अशी सक्त ताकीद सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी दिली.
मोदी सरकारने सीबीआयचे माजी संचालक आलोक वर्मा यांना तडकाफडकी सुट्टीवर पाठवल्यानंतर नागेश्वर राव यांच्याकडे हंगामी प्रमुखपद देण्यात आले होते. दरम्यानच्या काळात केंद्र सरकारनेही विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्याविरोधातील प्रकरणांची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. तर उपाधीक्षक ए. के. बस्सी यांची अंदमानला बदली करण्यात आली होती. यावरून मोठा गदारोळही झाला होता. यानंतर नागेश्वर राव यांनी हंगामी प्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर मुझफ्फरपूर शेल्टर बलात्कार प्रकरणाचे तपास अधिकारी ए.के. शर्मा यांची बदली केली होती.
दरम्यान, आजच्या सुनावणीत न्यायालयाने ए.के. शर्मा यांच्या बदली करण्याच्या प्रक्रियेत सामील असणाऱ्या अन्य अधिकाऱ्यांची नावेही सादर करण्याचे आदेश दिले. या सगळ्यांना १२ फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. तर नागेश्वर राव यांनाही न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यांनाही १२ फेब्रुवारीला न्यायालयासमोर हजर राहावे लागणार आहे.