चेन्नई : एकीकडे मुक्या प्राण्यांचा जीव घेण्यात आला तर दुसरीकडे अत्यंत भावुक करणारा व्हिडीओ समोर आला आहे. दोन्हीकडे हत्तीच आहे. एका घटनेत आपला जिवाभावाचा मित्र गेल्याच्या धक्क्यानं अधिकारी भावुक झाला. दुसरीकडे हत्तीवर अत्याचार होत असल्याची मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर एक व्हिडीओ IFS अधिकारी रमेश पांडे यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की हत्तीचा मृत्यू झाला आहे. या वयस्कर हत्तीचा मृत्यू झाल्याचा शोक अनावर झाल्यानं एका अधिकाऱ्याला रडू कोसळलं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


हा अधिकारी हत्तीची सोंड पकडून रडत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या अधिकाऱ्याची हत्तीसोबत खूप घट्ट मैत्री जमली होती. मात्र त्याच्या अचानक जाण्यानं अधिकाऱ्याच्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली. अशी भावना त्यानं व्यक्त केली आहे. 




'तामिळनाडूच्या मुदुमलाई टायगर रिझर्वमधील सदावियल एलिफंट कॅम्पच्या या व्हिडिओमध्ये जे दिसत आहे ते खूपच भावुक करणारं आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 66 हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे.


या हत्तीचा मृतदेह घेऊन जात असताना अधिकारी हत्तीची सोंड हातात घेऊन त्याला अखेरचं डोळेभरून पाहात होता. त्याचा हा व्हिडीओ पाहून युझर्सही भावुक झाले आहेत. तर दुसरीकडे आज तमिळनाडूमध्येच हत्तीला जीवे मारण्याचा निर्घृण प्रयत्न करण्यात आल्यानं संतापाची लाट उसळली आहे.


गावकऱ्यांनी हत्तीलाच पेटवून दिले. हा धक्कादायक प्रकार तामिळनाडूच्या मसिनागुडीत घडला आहे. गावात आलेल्या हत्तीला पिटाळून लावण्यासाठी गावकऱ्यांनी जळता टायर त्याच्या दिशेने फेकला. यात हत्ती होरपळून निघाला, अशी माहिती समोर आली आहे.