Automatic Number Plate Reader: टोलनाक्यांवर वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी टॅक्स वसूलीच्या (Toll Tax) नव्या नियमांवर सरकार काम करत आहे. याला स्वयंचलित नंबर प्लेट ओळख प्रणाली (Automatic Number Plate Reader) असं नाव देण्यात आलं आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. सरकार पथदर्शी प्रकल्प राबवत असून, त्याद्वारे महामार्गावरुन जाणाऱ्या वाहनांकडून योग्य अंतराच्या आधारे टोल आकारला जाईल. या नवीन तंत्रज्ञानामुळे दोन फायदे होऊ शकतील टोल नाक्यावर वाहणांची गर्दी होणार नाही आणि वापरानुसार पैसे आकारले जातील असं नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टोल टॅक्सवर प्रतीक्षा वेळ कमी होणार
जीपीएस आधारित टोलवसुली करण्याचाही सरकार विचार करत आहे. या पद्धतीमुळे टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागणार नाहीत. FASTag ने भारतीय रस्त्यांवर वाहनांची गर्दी कमी करण्यास मदत केली आहे यापूर्वी असं कधीही झालं नाही, असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. 


2018-19 मध्ये टोल प्लाझावर वाहनांची सरासरी प्रतीक्षा वेळ 8 मिनिटे होती. FASTag लागू झाल्यानंतर, 2020-21 आणि 2021-22 मध्ये वाहनांसाठी सरासरी प्रतीक्षा वेळ 47 सेकंदांवर आला आहे. पण शहरांजवळ आणि दाट लोकवस्तीच्या भागात टोल नाक्यावर अजूनही विलंब लागतोय. वाहनचालकांना सुरक्षित आणि सुलभ वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी, सर्व नवीन राष्ट्रीय महामार्गांवर आणि सध्याच्या 4-प्लस-लेन राष्ट्रीय महामार्गांवर प्रगत वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (ATM) स्थापित करण्यात येत असल्याची माहितीही नितीन गडकरी यांनी दिली आहे.