IPS आत्महत्या प्रकरणी धक्कादायक ट्विस्ट, तपास करणाऱ्या अधिकाऱ्याचीच आत्महत्या; VIDEO आणि तीन पानांच्या सुसाईड नोटने खळबळ

Hrayan IPS Suicide Case: रोहतकमधील एका शेतात सहाय्यक उपनिरीक्षक संदीप कुमार यांनी त्यांच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांनी एक व्हिडिओ आणि तीन पानांची सुसाईड नोट मागे सोडली आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 14, 2025, 05:39 PM IST
IPS आत्महत्या प्रकरणी धक्कादायक ट्विस्ट, तपास करणाऱ्या अधिकाऱ्याचीच आत्महत्या; VIDEO आणि तीन पानांच्या सुसाईड नोटने खळबळ

Haryana IPS Suicide Case: हरियाणाचे आयपीएस अधिकारी वाय पुरण कुमार यांच्या आत्महत्येच्या तपासात मोठा ट्विस्ट आला आहे. त्यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आज आणखी एका पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या केली. रोहतकच्या सायबर सेलमध्ये सहाय्यक उपनिरीक्षक म्हणून तैनात असलेले संदीप कुमार हे वाय पुरण कुमार यांच्याविरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी करत होते. त्यांनी सुसाईड नोटमध्ये आपण सत्यासाठी आयुष्य समर्पित करत असल्याचा उल्लेख केला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

संदीप कुमार यांनी रोहितकतमधील शेतात सर्व्हिस रिव्हॉल्वरने गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडीओ आणि तीन पानांची सुसाईड नोट सोडली आहे. संदीप कुमार यांनी आरोप केला आहे की, वाय पुरण कुमार हे भ्रष्टाचारी पोलीस होते आणि आपला भ्रष्टाचार उघड होईल अशी भीती त्यांना होती. त्यांनी असाही आरोप केला की आयपीएस अधिकाऱ्याने जातीभेदाच्या मुद्द्याचा वापर करून व्यवस्था हायजॅक केली.

सुसाईड नोटमध्ये अधिकाऱ्याने म्हटलं आहे की, भ्रष्टाचाराचे आरोप समोर आल्यानंतर वाय पुरण कुमार यांची बदली करण्यात आली. संदीप कुमार यांनी वाय पुरण कुमारच्या गनमनला दारू कंत्राटदाराकडून अडीच लाख रुपयांची लाच घेताना पकडले होते. एका गुंडाने धमकी दिल्यानंतर कंत्राटदार वाय पुरण कुमारला भेटला होता. लाचखोरीचे आरोप समोर आल्यानंतर आयपीएस अधिकाऱ्याने त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला आणि आत्महत्या केली.

मृत्यूपूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओ संदेशात संदीप कुमार म्हणाले की, वायएस पूरण कुमार यांना रोहतक रेंजमध्ये तैनात केल्यानंतर त्यांनी प्रामाणिक पोलिस अधिकाऱ्यांच्या जागी भ्रष्ट अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यास सुरुवात केली. "या लोकांनी फायली ब्लॉक केल्या, याचिकाकर्त्यांना बोलावले आणि पैसे मागून त्यांचा मानसिक छळ केला. बदल्यांच्या बदल्यात महिला पोलिस कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण केले गेले," असा आरोप त्यांनी केला.

"त्यांच्या भ्रष्टाचाराची मुळे खूप खोलवर रुजली आहेत. त्यांच्याविरुद्धच्या तक्रारीच्या भीतीने त्यांनी आत्महत्या केली आहे," असा आरोप संदीप कुमार यांनी केला. "त्यांच्या मालमत्तेची चौकशी झाली पाहिजे. हा जातीचा मुद्दा नाही. सत्य बाहेर आले पाहिजे. ते भ्रष्ट होते," असा आरोप त्यांनी केला.

"मी या सत्यासाठी माझे जीवन अर्पण करत आहे. मला अभिमान आहे की मी प्रामाणिकपणे उभा आहे. देशाला जागृत करण्यासाठी हे महत्वाचे आहे," असंही त्यांनी सांगितलं आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे.

संदीप कुमार यांनी रोहतकचे पोलिस प्रमुख नरेंद्र बिजार्निया यांचंही कौतुक केलं. वाय पुरण कुमार यांच्या त्यांच्या सुसाईड नोटमध्ये असलेल्या 10 अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा उल्लेख होता. त्यानंतर बिजार्निया यांची बदली करण्यात आली आहे.

 

FAQ

1) हे प्रकरण कशाबत आहे?

हरियाणातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या आत्महत्येचे प्रकरण आहे, ज्यात त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेद आणि व्यावसायिक छळाचे आरोप केले. या प्रकरणाच्या तपासातील आणखी एक पोलिस अधिकारी संदीप कुमार यांनीही आत्महत्या केली, ज्यात पुरण कुमार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले.

2) पुरण कुमार कोण होते?

पुरण कुमार हे २००१ बॅचचे आयपीएस अधिकारी होते, अनुसूचित जातीचे, ५२ वर्षांचे. ते हरियाणातील रोहतक येथील पोलिस प्रशिक्षण केंद्राचे महानिरीक्षक (आयजीपी) आणि अतिरिक्त महानिदेशक (एडीजीपी) पदावर होते.

3) दुसरं आत्महत्या प्रकरण काय आहे?

१४ ऑक्टोबर २०२५ रोजी रोहतक येथील लाधोत गावाजवळील शेतातील खोलीत एएसआय संदीप कुमार (रोहतक सायबर सेलमध्ये तैनात) यांनी स्वतःच्या सव्र्हिस रिव्हॉल्वरने आत्महत्या केली. त्यांनी ३ पानांची नोट आणि व्हिडिओ सोडला, ज्यात पुरण कुमार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. संदीप कुमार यांच्या म्हणण्यानुसार, पुरण कुमार हे भ्रष्ट अधिकारी होते, ज्यांनी रोहतक रेंजमध्ये प्रामाणिक अधिकाऱ्यांना हटवून भ्रष्टांना आणले, फाइल्स रोखल्या, पैशांसाठी याचिकाकर्त्यांना त्रास दिला आणि महिलांपोलिसांना ट्रान्सफरसाठी लैंगिक शोषण केले. त्यांनी माजी एसपी बिजारनियाचे समर्थनही केले.

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More