'दिल्लीतील लाल किल्ल्यावरचा हल्ला मोदी सरकार भारताविरुद्धचे युद्ध मानणार का?'

Red Fort Blast: "निरपराध्यांचे प्राण वाचवण्याची जबाबदारी गृहमंत्र्यांचीच होती. गृहमंत्री बिहारच्या राजकारणात उखाळय़ापाखाळय़ा काढण्यात दंग राहिलात," अशा शब्दांमध्ये अमित शाहांना लक्ष्य करण्यात आलं आहे. केंद्र सरकारवरही निशाणा साधला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 12, 2025, 09:55 AM IST
'दिल्लीतील लाल किल्ल्यावरचा हल्ला मोदी सरकार भारताविरुद्धचे युद्ध मानणार का?'
थेट नाव घेत साधला निशाणा (फोटो प्रातिनिधिक)

Red Fort Blast: "पहलगाम हल्ल्यातील गुन्हेगार अद्याप सापडलेले नाहीत. पुलवामाचे गुन्हेगार मोकाट आहेत. आता दिल्लीतील गुन्हेगार पळून गेले. सरकार हात चोळत बसले आहे," असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधताना म्हटलं आहे. "भारताचे सरकार हे आपल्याच नागरिकांचे बळी उघडय़ा डोळ्यांनी पाहत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ केले. ‘आता पाकिस्तानवर तिरंगा फडकवून माघारी येऊ. पाकिस्तानला अशी अद्दल घडवू की, पुन्हा पाकडे उठणार नाहीत,’ अशा डरकाळ्या तेव्हा सत्ताधाऱ्यांनी फोडल्या होत्या, पण प्रेसिडंट ट्रम्प यांनी व्यापार बंद करण्याची धमकी देताच ‘सिंदूर’ गुंडाळण्यात आले," असंही 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

Add Zee News as a Preferred Source

पाकड्या बापजाद्यांचे निर्मूलन आधी करा

"भारत सरकारने तेव्हा जाहीर केले, 'Any future terror act will be considered act of war against India.' म्हणजे भारतावरील यापुढील कोणताही दहशतवादी हल्ला हे युद्ध मानून कारवाई केली जाईल. हे खरे मानले तर दिल्लीतील लाल किल्ल्यावर झालेला सोमवारचा दहशतवादी हल्ला मोदी सरकार भारताविरुद्धचे युद्ध मानणार आहे काय? या हल्ल्यात दहा निरपराध लोक मारले गेले. हा हल्ला कोणी केला, याचा शोध घेण्याचे काम आता सुरू आहे. तुमचे शोध तुमच्यापाशी ठेवा. दहशतवादी आणि त्यांच्या पाकडय़ा बापजाद्यांचे निर्मूलन आधी करा," अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं केलीये.

एअर इंडिया अपघात की घातपात?

"दिल्लीतील स्फोटापूर्वी तीन राज्यांतील पोलीस कारवाईत 2900 किलो स्फोटके सापडली. दहशतवादी संघटनांशी संबंधित आठ-दहा लोकांना अटक केली तरीही दिल्लीत स्फोट व्हायचा तो झालाच. आता म्हणे, मुंबईसह प्रमुख शहरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गुजरातच्या मुंद्रा बंदरावर एकाच दिवशी लाखो कोटींचे अमली पदार्थ जप्त होतात. या सगळ्याचे कनेक्शन पाकिस्तान, अफगाणिस्तानशी असल्याचे उघड होते. अहमदाबाद विमानतळावरून उडालेले एअर इंडियाचे विमान दोन सेकंदांत खाली कोसळते. हा अपघात की घातपात, याच्या रहस्याचा पडदा अद्यापि कायम आहे," असा उल्लेखही ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे.

नक्की वाचा >> ...तर गृहमंत्री अमित शहांचा राजीनामा मागा! ठाकरेंच्या सेनेचं भाजपा समर्थकांना आवाहन

निरपराध्यांचे प्राण वाचवण्याची जबाबदारी तुमचीच होती

"मोदी व शहांना ठार मारण्याचे कट अधूनमधून उधळले जात असतात, पण हे सर्व लोक अभेद्य सुरक्षेच्या पिंजऱ्यात बसले आहेत व देशातील नागरिक रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी भयाच्या सावटाखाली कसाबसा जगतो आहे. दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ गजबजलेल्या चांदनी चौकात स्फोट होतो तेव्हा किमान शंभर जणांचे जीव संकटात येतात. पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीतील स्फोटानंतर संवेदना वगैरे व्यक्त केल्या. गृहमंत्र्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला, पण निरपराध्यांचे प्राण वाचवण्याची जबाबदारी तुमचीच होती. तुम्ही बिहारच्या राजकारणात उखाळय़ापाखाळय़ा काढण्यात दंग राहिलात आणि दहशतवाद्यांनी भारतात शिरकाव केला," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलंय.

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More