...तर गृहमंत्री अमित शहांचा राजीनामा मागा! ठाकरेंच्या सेनेचं भाजपा समर्थकांना आवाहन

Slams Amit Shah For Delhi Red Fort Bomb Blast: "देशावर दहशतवादी हल्ला झाल्याची बोंब ठोकली गेली, पण या दहशतवादी हल्ल्यास स्वतः पंतप्रधान व गृहमंत्री जबाबदार आहेत. त्यांना देश सांभाळता येत नाही. "

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 12, 2025, 07:59 AM IST
...तर गृहमंत्री अमित शहांचा राजीनामा मागा! ठाकरेंच्या सेनेचं भाजपा समर्थकांना आवाहन
थेट नाव घेत साधला निशाणा (फोटो प्रातिनिधिक)

Slams Amit Shah For Delhi Red Fort Bomb Blast: "दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरली आहे. ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी हे राष्ट्राला उद्देशून भाषण देतात, दहशतवादाचा बीमोड करण्याचे आश्वासन देतात, त्याच लाल किल्ला परिसरात दहशतवाद्यांनी बॉम्ब फोडले. दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरली असताना पंतप्रधान, गृहमंत्री यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ बिहार निवडणुकांच्या प्रचारात दंग होते. पंतप्रधान तर भूतानला पोहोचले. भूतानमधून त्यांनी इशारा दिला, ‘‘कुणालाही सोडणार नाही.’’  स्फोटात आतापर्यंत बारा जण ठार झाले. पंचवीस नागरिक जखमी झाले. दिल्लीच्या रस्त्यावर किडय़ामुंग्यांसारखी माणसे मारली जात आहेत व सरकार बिहारातील निवडणुकांत दंग आहे," असा घणाघात ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे.

Add Zee News as a Preferred Source

गुप्तचर खातं राजकीय विरोधकांविरोधात जुंपलं

"दहशतवाद हा जागतिक चिंतेचा विषय आहे. भारतात तो राजकीय विषय बनला आहे. प्रत्येक दहशतवादी हल्ल्याचे राजकारण करायचे, प्रत्येक हल्ल्याचा प्रचारात वापर करायचा, हिंदू-मुसलमानांत तेढ निर्माण करून राजकीय भाकऱ्या शेकायच्या हेच उद्योग गेल्या दहा वर्षांत घडले. देशाची राजधानीच सुरक्षित नसेल तर या देशात काय सुरक्षित आहे?" असा सवाल 'सामना'च्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. "जम्मू-कश्मीरात भारतीय पर्यटक सुरक्षित नाहीत. मणिपूरसारख्या राज्यात जनता सुरक्षित नाही. राजधानी दिल्लीत कधीही, कोठेही बॉम्बस्फोट होऊ शकतो. पहलगाम येथे 26 पर्यटकांना मारण्यासाठी दहशतवादी घुसले व महिलांचे कुंकू पुसून निघून गेले तरी गृहखात्यास पत्ता लागला नाही. भारतीय गृहखात्याची ‘इंटेलिजन्स’ यंत्रणा पूर्णपणे कोलमडून पडल्याचा हा पुरावा आहे. इतका मोठा हल्ला होतो व गुप्तचरांना माहिती मिळत नाही? गुप्तचर खात्याचे राजनीतीकरण झाले आहे. दहशतवाद्यांचा माग काढण्याऐवजी राजकीय विरोधकांचा माग काढण्यासाठीच यंत्रणा बैलाप्रमाणे जुंपली आहे," असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे.

सगळ्यात कमजोर आणि बकवास गृहमंत्री

"सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करू, असे श्री. शहा वारंवार सांगतात. त्यांच्या दृष्टीने विरोधी पक्षांचे नेते हे दहशतवादी आहेत व त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सध्या सुरक्षा यंत्रणांचा वापर केला जात आहे. सोमवारच्या दिल्लीतील स्फोटाचा वापर बिहारमधील मंगळवारी पार पडलेल्या मतदानाच्या शेवटच्या टप्प्यासाठी केला गेला. देशावर दहशतवादी हल्ला झाल्याची बोंब ठोकली गेली, पण या दहशतवादी हल्ल्यास स्वतः पंतप्रधान व गृहमंत्री जबाबदार आहेत. त्यांना देश सांभाळता येत नाही. त्यांना कायदा आणि सुव्यवस्थेचे काहीच पडलेले नाही. स्वतःला सरदार पटेल यांच्या रूपात पाहणारे अमित शहा हे आतापर्यंतचे सगळ्यात कमजोर आणि बकवास गृहमंत्री आहेत," अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे.

"अमित शाहांच्या डोळ्यांसमोर 26 महिलांचे कुंकू पुसले जाते, त्यांच्या नाकासमोर स्फोट घडवून लाल किल्ला हादरवला जातो आणि गृहमंत्री त्यांचे पंचरंगी उपरणे खांद्यावर टाकून बैठकाच घेत आहेत. दिल्लीच्या बॉम्बस्फोटाने राष्ट्रासमोर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दहशतवादाचा बीमोड करण्यात आणि राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देण्यात मोदी-शहांचे सरकार अपयशी ठरले आहे. त्यांनी राजीनामा दिला तर 140 कोटी जनतेवर उपकार ठरतील, नाहीतर कधी दिल्ली, कधी मुंबई, कधी बंगळुरूसारखी शहरे रक्ताने लथपथ होऊन तडफडताना दिसतील. भाजपवाल्यांनो, भारतमातेचे खरे भक्त असाल तर गृहमंत्री अमित शहांचा राजीनामा मागा. तीच देशसेवा ठरेल," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More