Success Story: आपल्या लेकीने आयुष्यात मोठ्या पदावर काम करावं, खूप नाव कमवावं असं प्रत्येक वडिलांना वाटत असतं. समाज आपल्याला आपल्या लेकीमुळे ओळखतो, ही वडिलांसाठी अभिमानाची गोष्ट असते. अशाच एक मेहनती वडिलांच्या जिद्दी लेकीची ही कहाणी आहे. या लेकीने आपल्या कर्तृत्वाने आपल्या वडिलांचे नाव रोशन केलं. आयएएस रुपल राणा यांची प्रेरणादायी कहाणी आपण जाणून घेणार आहोत. आयुष्यात आलेल्या सर्व आव्हानांना न जुमानता त्यांनी आपले आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले. रुपल यांचे वडील दिल्ली पोलिसात असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणून काम करत आहेत. ज्यांना त्यांच्या मुलीच्या यशाचा अभिमान वाटतो.
रूपल राणा या मूळच्या उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील आहेत. त्यांनी UPSC नागरी सेवा परीक्षा 2024 मध्ये उत्तीर्ण केली. या परीक्षेत त्यांनी ऑल इंडिया 26 वा क्रमांक मिळवून इतिहास रचला. काहीतरी चांगले करण्याची इच्छा असेल, त्याला प्रामाणिकपणा,मेहनतीची जोड असेल तर तुम्ही अडचणींवर मात करुन मोठे यश मिळवू शकता हे रुपल यांची कहाणी वाचून लक्षात येईल.
रुपल यांनी बागपत येथील जेपी पब्लिक स्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. हायस्कूलच्या परीक्षेत त्यांना 10 सीजीपीए गुण मिळाले. यानंतर त्यांनी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, पिलानी येथून अकरावी आणि बारावीचे शिक्षण पूर्ण केले. मग त्यांनी बी.एस्सी केले. दिल्ली विद्यापीठाच्या देशबंधू कॉलेजमधून. पदवी पूर्ण केली. जिथे रूपल विद्यापीठात टॉपर ठरल्या होत्या.
रुपलं यांच्या लहानपणीच आईचे निधन झाले. त्यामुळे आयुष्यात त्यांना आईचे प्रेम मिळाले नाही. असे असले तरी वडिलांनी त्यांना ही कसर कधी जाणवू दिली नाही. त्यांचे वडील जसवीर राणा हे दिल्ली पोलिसात असिस्टंट सब-इन्स्पेक्टर म्हणजे एएसआय आहेत. त्यांनी रुपलला खूप आधार दिला. तसेच भाऊ-बहिणींनीही त्यांना पाठिंबा दिला. रुपल यांनी स्वत:च्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि यश मिळवले. वैयक्तिक आयुष्यात आलेल्या दुःखाने त्या खचून गेल्या नाही. त्यांना त्याला स्वत: च्या शक्तीत रुपांतरीत केले.
रुपल यांना यश सहजासहजी मिळाले नाही. रुपल यांना पहिल्या दोन प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत अपयश हाती आले. पण त्यांनी हार मानली नाही. चुकांमधून त्या शिकत गेल्या आणि त्यांनी स्वत:च्या धोरणात सुधारणा केली.
अखेर रुपल यांना त्यांच्या दृढनिश्चय आणि कठोर परिश्रमाचे फळ मिळाले. त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण केली आणि आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. त्यांनी 2024 च्या यूपीएससी परीक्षेत 26 वा क्रमांक मिळवला.
रुपल राणा यांच्या यशाची कहाणी जगभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. कौटुंबिक मूल्ये, समर्पण आणि घरी सहाय्यक वातावरण असेल तर यश मिळते, ते या कहाणीतून कळते.