'नरेंद्र मोदी अमेरिकेच्या हातची कठपुतली', विरोधकांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

America-Israel vs Iran War: अमेरिकेनं भारताला रशियाकडून तेल खरेदीसाठी मुभा दिलीय. 4 एप्रिलपर्यंत भारत रशियाकडून तेल खरेदी करू शकणार आहे. मात्र यातही काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. यावरूनच विरोधकांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय.   

मनाली सागवेकर | Updated: Mar 6, 2026, 08:35 PM IST
'नरेंद्र मोदी अमेरिकेच्या हातची कठपुतली', विरोधकांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

US Gives India Permission To Buy Oil From Russia: इराण-इस्त्रायल युद्धामुळे भारताचा तेल पुरवठा खंडित झालाय. आता भारत रशियाकडून तेल खरेदी करणार आहे. अमेरिकेनं भारताला रशियाकडून तेल खरेदीसाठी 4 एप्रिलपर्यंत मुदत दिलीय. अमेरिकेनं तेल खरेदीसाठी तात्पुरती सूट दिलीय. पश्चिम आशियातील युद्धस्थिती आणि तेलपुरवठ्यावर परिणाम झाल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं भारताला ही मर्यादित सवलत दिली आहे. ही सूट फक्त समुद्रात अडकलेल्या रशियन तेलाच्या कार्गोसाठी लागू असेल. नवीन तेल खरेदीला परवानगी नसणार आहे, असं अमेरिकेच्या ट्रेझरी विभागानं स्पष्ट केलंय. समुद्रात असलेल्या रशियन टँकर्समधून तेल खरेदी करण्याची परवानगी भारताला मिळाली आहे. मध्य पूर्वेतील तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण होऊ नये, यासाठी अमेरिकेनं हे पाऊल उचलल्याचं म्हटलंय.

भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता?

युक्रेनवर हल्ला केल्यामुळे रशियावर दबाव आणण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या नोव्हेंबरमध्ये रशियाच्या लुकोईल आणि रॉसनेफ्ट  या तेल कंपन्यांवर निर्बंध लादले होते. जानेवारी महिन्यात भारताची रशियन कच्च्या तेलाची आयात घटून दररोज सुमारे 11 लाख (1.1 दशलक्ष) बॅरलवर आली होती. नोव्हेंबर 2022 नंतरचा हा सर्वात कमी आकडा होता. अमेरिकेने शुल्क लावल्यानंतर रशियाकडून होणारी तेल आयात 21.2 टक्क्यांनी कमी झाली होती. मध्य पूर्वेत इराणच्या हल्ल्यामुळे तेल उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. जागतिक तेल पुरवठ्यापैकी 20 टक्के पुरवठा करणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणने नाकेबंदी केल्यानं परिस्थिती आणखी गंभीर झाली. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती भडकल्या आज सकाळी ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत प्रति बॅरल 83.7 डॉलरवर पोहोचली आहे. मात्र, असं असलं तरी भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता नाही असं समजतंय. 

विरोधकांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं

यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. 'भारताकडून कुणी काय खरेदी करायचं हे अमेरिका ठरवतंय. नरेंद्र मोदी अमेरिकेच्या हातची कठपुतली झालेत,' असा हल्लाबोल खासदार संजय राऊतांनी केलाय. तर राऊतांनी खालची भाषा वापरल्यामुळेच जनता त्यांना त्यांची जागा दाखवते, असं नवनाथ बन यांनी म्हटलंय.  भारत-पाकिस्तानचं युद्ध आपण थांबवल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प अनेकदा करत असतात. आता भारतानं रशियाकडून तेल खरेदी कशी आणि कधी करावी हेही अमेरिका ठरवताना दिसतीये. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारला धारेवर धरलंय.

About the Author

Manali Sagvekar

सध्या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये कॉन्टे्ट रायटर म्हणून इंटर्नशिप करत आहे. याआधी 'सकाळ मीडिया' ग्रुपमध्ये (जानेवारी २०२४ - एप्रिल २०२४) एंटरटेनमेंट बीटचा भाग म्हणून इंटर्नशिप केली आहे, जिथे मराठी मनोरंजन बातम्या, सेलिब्रिटी अपडेट्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी जीवनशैली सेक्शनमध्ये कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. नंतर, 'साम टीव्ही मराठी'मध्ये (जुलै २०२५ - सप्टेंबर २०२५) डिजिटल न्यूजरूम (लाइफस्टाइल बीट) मध्ये देखील इंटर्नशिप केली, जिथे मराठीमध्ये आकर्षक जीवनशैली कॉन्टेन्ट तयार केले, CMS आणि Google Workspace सह काम करायला शिकले आणि डिजिटल सामग्री वर्कफ्लोमध्ये अनुभव मिळवला.

...Read More