बापरे! यात्रेदरम्यान कोसळला 150 फूट उंच रथ; सोशल मीडियावर वारंवार पाहिला जातोय धडकी भरवणारा हा व्हिडीओ

Viral video : सध्या यात्रा आणि जत्रांचा माहोल सुरू असून देशाच्या  विविध राज्यांमध्ये विविध परंपरांना अनुसरून हे उत्सव पार पडत आहेत. त्याचदरम्यानचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला.   

सायली पाटील | Updated: Mar 25, 2025, 08:19 AM IST
बापरे! यात्रेदरम्यान कोसळला 150 फूट उंच रथ; सोशल मीडियावर वारंवार पाहिला जातोय धडकी भरवणारा हा व्हिडीओ
Viral video karnataka Madduramma Devi Jaathre Turns Into Chaos As 2 Towering Chariots rath Collapse

Viral video : मागील काही दिवसांपासून विविध राज्यांमध्ये, विविध खेडेगावांमध्ये ग्रामदेवतांच्या यात्रोत्सव आणि जत्रोत्सवांना सुरुवात झाली आहे. इथं महाराष्ट्रात कोकण पट्ट्यामध्ये शिमगोत्सवाची धूम असतानाच दारोदारी येणाऱ्या पालख्यांना अनन्यसाधारण महत्त्वं जिलं जात असल्याचं पाहायला मिळालं. देशातील इतर भागसुद्धा यास अपवाद ठरले नाहीत. अर्थात तिथं शिमग्याच्या निमित्तानं येणाऱ्य़ा पालख्या नसल्या तरीही स्थानिक देवदेवतांचे रथोत्सव आणि तत्सम उत्सव मात्र पार पडताना दिसले. 

दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यामध्येही असाच एक उत्सव पार पडताना अतिशय दुर्दैवी घटना घडली आणि या आनंदी वातावरणाला गालबोट लागलं. बंगळुरूनजीक एका यात्रेदरम्यान घडलेल्या या दुर्घटनेमध्ये 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली असून यामध्ये कैक भाविक जखमी झाल्याचंही म्हटलं गेलं. 

बंगळुरू होसूर मगामार्गावर हुस्कुरनजीक मदुरम्मा देवी जत्रोत्सवात  (Huskur Madduramma Temple Fair) ही भीषण घटना घडली. जिथं, जत्रेदरम्यान उंच रथ मंदिरासमो येणं अपेक्षित होतं. अतिशय नेत्रदीपक असा हा सोहळा पाहण्यासाठी इथं अनेकांची गर्दी जमली होती. मात्र अचानकच या ठिकाणी सोसाट्याचा वारा सुटला आणि मंदिरापाशी येणाऱ्या रथांचं संतुलन बिघडलं. प्रचंड उंची असल्या कारणानं रथ वाऱ्याच्या वेगामुळं हेलकावे खाऊ लागले आणि काहीतरी अघटीत घडणार या भीतीनं तिथं असणारी गर्दी पांगवली. पाहता पाहता रथ एका दिशेला झुकला, पुरता कोसळला आणि काही कळायच्या आतच हा आनंदोत्सव एका संकटाच्या गर्त छायेत पोहोचला. 

प्रत्यक्षदर्शींनी घडला प्रकार कथन करताना आपण रथापासून काही अंतरावरच होतो आणि तो कोसळला. पुढच्याच क्षणी तिथं धुरळा... किंकाळ्या... असं वातावरण पाहायला मिळाल्याचं अतिशय भयभीत वर्णन करत प्रसंग समोर मांडला. 

रथ कोसळत असतान त्यावर असणाऱ्यांनी जीव वाचवून खाली उड्या मारल्यानं मोठी जिवीत हानी टळली. दरम्यान हुस्कूर इथं अशी घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीसुद्धा इथं 120 फूट उंचीचा रथ कोसळल्याची घटना घडली होती. मद्दुरम्मा देवीला समर्पित ही जत्रा या भागात दरवर्षी आयोजित केली जाते. महत्त्वाची बाब म्हणजे 2021 पूर्वी या गावात रथांची उंची सामान्य प्रमाणात असे. मात्र, मंदिर प्रशासनानं सर्वोत्कृष्ट रथासाठी रोकड स्वरुपात बक्षिसाची घोषणा केली आणि यामुळं ही स्पर्धा वाढली. 

सूत्रांच्या माहितीनुसार इथं उपजिल्हाधिकारी कार्यालयानं रथांच्या उंचीसंदर्भात नियम आखून देत ही उंची 80 फूट इतकी असावी असं म्हटलं मात्र ग्रामीण नागरिकांनी याचा विरोध करत आपण नियम येण्याआधीच रथ तयार करण्यास सुरुवात केल्याचं कारण पुढे करत पुढल्या वर्षी या नियमांचं पालन करू अशी भूमिका मांडली आणि संस्कृती जपण्यासाठी म्हणून आयोजित केली जाणारी ही स्पर्धा एका क्षणार रंगाचा बेरंग करून गेली.