पैसे देण्यास नकार देणाऱ्या तरुणाची तृतीयपंथीयांकडून हत्या, धावत्या ट्रेनमधून खाली फेकून दिलं; VIDEO त झाले कैद

तृतीयपंथीयांनी ट्रेनमध्ये एका तरुणाची  बेदम मारहाण करत हत्या केली. या मारहाणीचा व्हिडीओ समोर आला आहे.  

शिवराज यादव | Updated: Mar 23, 2025, 10:03 AM IST
पैसे देण्यास नकार देणाऱ्या तरुणाची तृतीयपंथीयांकडून हत्या, धावत्या ट्रेनमधून खाली फेकून दिलं; VIDEO त झाले कैद

तृतीयपंथीयांनी ट्रेनमध्ये एका तरुणाची  बेदम मारहाण करत हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील विदिशा येथे ही घटना घडली असून, एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तृतीयपंथी तरुणाला अत्यंत अमानुषपणे मारहाण करताना दिसत आहेत. मृत तरुणाची ओळख आदर्श विश्वकर्मा अशी झाली आहे. तो गंजबसौदा येथे वास्तव्यास होता. नोकरीच्या निमित्ताने तो रोज गंजबसौदा ते भोपाळ असा प्रवास करत असे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आदर्श 15 मार्चच्या रात्र गोंडवाना एक्स्प्रेसमधून गंजबसौदाला परतत होता. प्रवासात असताना रांचीच्या आसपास तृतीयपंथीयांनी पैसे मागण्यास सुरुवात केली. यावेळी पैसे न देण्यावरुन तृतीयपंथी आणि आदर्शमध्ये वाद झाला. हा वाद इतका वाढला की, तृतीयपंथीयांनी निर्दयीपणे त्याला मारहाण केली. व्हिडीओत आदर्श खाली पडला असून, तृतीयपंथी त्याच्या अंगावर उड्या मारताना दिसत आहे. यादरम्यान एक प्रवासी तो मेला आहे, आता तरी थांबा असं सांगत असल्याचं ऐकू येत आहे. 

पोलिसांना 14 मार्चला रेल्वे ट्रॅकच्या जवळ आदर्शचा मृतदेहा आढळला होता. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. त्याचदरम्यान सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असता चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. 

"व्हिडिओ समोर आल्यानंतर, पोलिस अधीक्षकांनी विश्वकर्माच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांचा शवविच्छेदन अहवाल प्रतीक्षेत आहे," असं गंजबासोदा पोलिस ठाण्याचे प्रभारी योगेंद्र सिंग परमार यांनी सांगितलं आहे.

आदर्श विश्वकर्मा मंत्र्यांचा खास

या संदर्भात, राज्याच्या विश्वकर्मा कल्याण मंडळाचे कॅबिनेट मंत्री दर्जाचे अध्यक्ष प्रेम नारायण विश्वकर्मा म्हणाले आहेत की, आदर्श हा त्यांचा नातेवाईक होता आणि या घटनेबद्दल समाजात तीव्र संताप आहे. त्यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

कुटुंबाची न्यायासाठी याचना 

मंत्र्यांनी सांगितलं की, आदर्श विश्वकर्मा दररोज गंजबासोदा ते भोपाळ असा प्रवास करत असे. तृतीयपंथीयांनी त्याच्यावर ट्रेनमध्ये हल्ला केला आणि त्याला निर्घृणपणे ठार मारले. प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. आदर्शचा नातेवाईक सोहन विश्वकर्मा म्हणाला की, आमचे कुटुंब न्यायासाठी याचना करत आहे. प्रशासनाने दोषींवर कडक कारवाई करावी.

पोलिसांनी काय म्हटले?

दरम्यान, शहर पोलिस ठाण्याचे योगेंद्र सिंह परमार म्हणाले की, ते या संदर्भात काहीही सांगू शकत नाहीत, परंतु गंजबासोदा येथील रेल्वे ट्रॅकवर एक मृतदेह निश्चितच आढळला आहे.