Viral Video: प्रेम म्हटलं की सर्व सीमा ओलांडून, समाजासह अनेकदा कुटंबीयांचा रोष ओढावून पुकारण्यात आलेलं बंड असतं. या प्रेमाला जेव्हा कुटुंब विरोध करतं तेव्हा अनेक प्रेयसी-प्रियकर इच्छा नसतानाही घर सोडून पळून जाण्याचा पर्याय निवडतात. घरापासून दूर जाऊन नव्याने संसार सुरु केला तरी आपल्या डोक्यावर कुटुंबीयांचा हात नाही किंवा पाठीसी कोणी हक्काचं व्यक्ती नाही ही खंत कायम असते. आपलाही विवाहसोहळा इतरांप्रमाणे थाटात व्हायला हवा होता ही सलही काहींच्या मनात असते. मात्र एका जोडप्याला 64 वर्षानंतर आपलं हे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली. त्यांच्या राजेशाही थाटातील लग्नाचा गोड व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गुजरातमधील हर्ष आण मृन्नू लहानपणीच एकमेकांच्या प्रेमात पडले होते. पण त्यांच्यात धर्माची भिंत आडवी येत होती. अखेर 64 वर्षांपूर्वी त्यांनी घऱ सोडून पळून जाण्याचं ठरवलं. पण अखेर त्यांच्या नातवंडांनी त्यांची स्वप्नवत लग्नाची इच्छा पूर्ण केली असून हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकरी भावूक झाले आहेत.
The Culture Gully या इंस्टाग्राम पेजवर हर्ष आण मृन्नू यांची लव्हस्टोरी शेअर करण्यात आली आहे. या व्हिडीओत त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ आहेत. तसंच कुटुंब, समाजाच्या विरोध जात त्यांनी आपल्या प्रेमाचा प्रवास कसा सुरु केला आणि आज तो कसा साजरा होत आहे याची माहिती दिली आहे.
पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे त्यानुसार, हर्ष नावाचा जैन मुलगा आणि मृन्नू नावाची ब्राह्मण मुलगी 1960 च्या दशकात शाळेत असताना प्रेमात पडले. प्रेमविवाह दुर्मिळ असताना लपून पाहणाऱ्या नजरा आणि हस्तलिखित पत्रांमधून त्यांच्यातील प्रेमसंबंध फुलले. जेव्हा मृन्नू यांच्या कुटुंबाने त्यांच्या लग्नाला नकार दिला तेव्हा त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला. त्यांनी आपल्या एका मैत्रिणीकडे एक चिठ्ठी सोडली ज्यामध्ये लिहिले होते, "मी परत येणार नाही."
प्रेम आणि दृढनिश्चयाशिवाय दुसरं काहीही नसलेले जीवन सुरू करण्यासाठी हे जोडपे पळून गेले. अत्यंत साधेपणाने त्यांचा विवाह झाला. त्यावेळी मृन्नू यांच्या साडीची किंमत फक्त 10 रुपये होती. त्यावेळी कोणताही भव्य समारंभ नव्हता, फक्त एकत्र राहण्याचं वचन होतं.
मात्र आता इतक्या वर्षांनी त्यांची मुलं आणि नातवंडांनी राजेशाही थाटात विवाहसोहळा आयोजित करत त्यांच्या आयुष्यात राहिलेली ती अपूर्ण इच्छा पूर्ण केली. व्हायरल व्हिडीओत अत्यंत सुंदरपणे त्यांचा प्रवास मांडण्यात आला आहे. व्हिडीओत त्यांच्या भेटीपासून ते लग्नापर्यंतचे सर्व फोटो आहेत, जे पाहताना भावूक व्हायला होतं.
भावनिक पोस्टच्या शेवटी एक महत्वाचा संदेश देण्यात आला आहे. "खरं प्रेम तुम्ही किती वेळ वाट पाहता यावर अवलंबून नाही; ते तुम्ही किती मजबूतपणे धरुन ठेवता यावर अवलंबून आहे."
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिलं आहे की, "ही मी पाहिलेली सर्वात सुंदर प्रेमकथा आहे. खरे प्रेम नेहमीच जिंकते."
दुसऱ्याने लिहिलं आहे की, "त्यांनी सर्व अडचणींवर मात करत आपलं आयुष्य निर्माण केलं आणि आता त्यांच्या पात्रतेनुसार लग्न होत असताना पाहून अश्रू येत आहेत!". एकाने म्हटलं आहे की, "हे सिद्ध करतं की प्रेमाला धर्म, समाज किंवा वेळ असे कोणतेही अडथळे नसतात".