'मानलं ग मुली तुला,' मुलीने आपल्यालाच घातलेला गंडा पाहून स्कॅमरही भारावला, VIDEO तुफान व्हायरल

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मुलगी आपल्या वडिलांचा मित्र असल्याचं भासवणाऱ्या स्कॅमरला त्याच्याच जाळ्यात ओढताना दिसत आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 14, 2025, 07:38 PM IST
'मानलं ग मुली तुला,' मुलीने आपल्यालाच घातलेला गंडा पाहून स्कॅमरही भारावला, VIDEO तुफान व्हायरल

Viral Video: सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात लोकांना लुटण्यासाठीही ऑनलाइन पद्धतीने गंडे घातले जात आहेत. लोकही याला बळी पडत असल्याने सायबर गुन्हेगारांचं पेव आलं आहे. मात्र एका तरुणीने आपल्याला गंडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्कॅमरला त्याच्याच जाळ्यात ओढलं. मुलीची हुशारी पाहून हा सायबर गुन्हेगारही तिचं कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही. फोन कट करण्याआधी त्याने तुला मानलं असं म्हटलं. 
 
व्हायरल व्हिडीओत मुलगी स्कॅमरचा फोन आल्यानंतर व्हिडीओ शूट करताना दिसत आहे. समोरील व्यक्ती तिला आपण तुझ्या वडिलांचे मित्र आहोत असं सांगतो. तुझ्या वडिलांनी मला युपीआच्या माध्यमातून काही पैसे पाठवण्यास सांगितलं असल्याची खोटी माहिती तो देतो. यादरम्यान तो आत्मविश्वास आणि प्रेमाने बोलताना दिसत आहे. आपण तुला युपीआच्या माध्यमातून 12 हजार पाठवत असल्याचं तो तिला सांगतो. 

सुरुवातीला तो मुलीला 10 रुपये आणि नंतर 10 हजार पाठवतो. मुलीच्या मोबाईलवर अकाऊंटला पैसे जमा झाल्याचा संदेशही येतो. मुलगी हे मेसेज स्क्रीनवर दाखवते. मात्र हा मेसेज बँकेक़डून आलेला नसून, फसवणूक कऱणाऱ्याने पाठवलेला असता. यानंतर तो मुलीला जाळ्यात ओढण्यासाठी 2 हजार रुपये पाठवतो सांगत 20 हजार पाठवतो.

मुलगी 20 हजार रुपये पाठवले आहेत असं सांगताच तो आपली चूक झाली सांगून, 18 हजार रुपये मला परत पाठव असं म्हणतो. यासाठी तो तिला आपला नंबर देतो. पण मुलगी त्याच्याशी त्याचाच गेम खेळत असल्याची कल्पना त्याला नसते. मुलगी त्याने पाठवलेला खोटा मेसेज कॉपी करते आणि तो ए़डिट करुन त्यालाच पुन्हा पाठवते. यानंतर मी तुम्हाला 18 हजार पाठवले असल्याचं ती त्याला सांगते. 

"अंकल तुम्हाला 18 हजार पाठवले आहेत," असं ती आपलं हसू रोखत सांगते. स्कॅमरही आपण पकडले गेल्याचं समजल्यानंतर प्रभावित होतो आणि फोन कट करण्याआधी, 'मानलं तुला मुली' असं म्हणतो. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी तुफान कमेंट्स केल्या असून, मुलीचं कौतुक करत आहेत.