Viral Video: लग्नाच्या उद्देशाने कॅनडाहून भारतात आलेल्या भारतीय वंशाच्या जोडप्याला लग्नात मात्र पश्चातापाची वेळ आली. लग्नात कलर बॉम्ब पाठीवर फुटल्याने नवरीमुलगी जखमी झाली आणि आनंदाच्या या क्षणाचं रुपांतर दु:खात झालं. विकी आणि प्रिया यांनी लग्नातील हा व्हिडीओ इंस्टाग्रामला शेअर केला आहे. तसंच लग्नात फटाके वाजवताना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. व्हिडीओत नवविवाहित जोडपं मागे कलर बॉम्ब फोडत तो क्षण कॅमेऱ्यात कैद करण्याच्या उद्देशाने पोझ देऊन उभं असतं. पण कलर बॉम्ब चुकीच्या दिशेला फुटतो आणि थेट नवरीमुलीच्या पाठीला लागतो. यादरम्यान नवऱ्यामुलाने नवरीमुलीला फोटोसाठी उचलून घेतलेलं असतं.
"बॅकग्राऊंडला तीन सुंदर रंगीत बॉम्ब फोडून ते फोटोत कैद करण्याची योजना होती. परंतु ते खराब झाले आणि आमच्यावरच फुटले. आम्ही आमच्या बाळालाही आमच्यासोबत घेऊन जाणार होतो," असं पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
व्हिडीओमध्ये नवरीमुलीच्या जखमा स्पष्टपणे दिसत आहेत. तिच्या पाठीला जखम झाली असून, केसही जळाले. यानंतर तिला तात्काळ वैद्यकीय मदत देण्यात आली.
इंस्टाग्राम स्टोरीमध्ये जोडप्याने सांगितलं आहे की लग्न आणि रिसेप्शनच्या दरम्यान फोटो काढत असताना ही घटना घडली. "आम्ही उपचार करण्यासाठी जवळच्या रुग्णालयात गेलो आणि तरीही आमच्या रिसेप्शनला पोहोचलो आणि उर्वरित रात्र एन्जॉय केली," असा खुलासा त्यांनी केला आहे.
"ही पोस्ट तुमच्या कार्यक्रमांमध्ये रंगीत बॉम्ब फटाके वापरण्याचे धोके सामायिक करण्यासाठी आहे. आम्ही सर्व सुरक्षा खबरदारी पाळली आणि तरीही काहीतरी बिघाड झाला आणि आम्हाला दुखापत झाली. तुम्ही वाईट नजरेवर विश्वास ठेवा किंवा नसो, आम्ही नक्कीच करतो!", असं जोडप्याने कमेंट सेक्शनमध्ये लिहिलं आहे.
व्हिडीओ शेअर केल्यापासून त्याला 22 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. कमेंट सेक्शनमध्ये, अनेक युजर्सनी जखमी नवरीमुलीबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. "हे भयानक आणि दुःखद आहे. तुम्ही लवकर बरं व्हावं अशी शुभेच्छा. इतक्या महत्त्वाच्या, सुंदर दिवशी असा अपघात होतो तेव्हा ते नक्कीच वाईट असते. काळजी घ्या मित्रांनो!" असं एका युजरने लिहिलं आहे. तर एका युजरने तुमचा इव्हेंट प्लॅनर यासाठी जबाबदार असून, इतक्या महत्वाच्या दिवशी हे झालं याचं वाईट वाटतं असं म्हटलं आहे.