'महाशिवआघाडी'चं एक पाऊल पुढे, पण चर्चेचं गुऱ्हाळ सुरुच

तब्बल ३ तासांनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक संपली आहे. 

Updated: Nov 20, 2019, 09:42 PM IST
'महाशिवआघाडी'चं एक पाऊल पुढे, पण चर्चेचं गुऱ्हाळ सुरुच

नवी दिल्ली : तब्बल ३ तासांनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक संपली आहे. लवकरच राज्यात स्थिर आणि लोकाभिमुख सरकार देऊ, असं वक्तव्य काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या बैठकीनंतर दिलं आहे. दोन्ही पक्षांमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे. आज आणि उद्यादेखील काही मुद्द्यांवर चर्चा होणार आहे, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

दुसरीकडे लवकरच महाराष्ट्रात पर्यायी सरकार देऊ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. तीन पक्षसोबत आल्याशिवाय महाराष्ट्रात सरकार स्थापन होणार नाही, त्यामुळे राज्यात लवकरच पर्यायी सरकार येईल, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठकीला दोन्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीला अहमद पटेल, के सी वेणुगोपाल, मल्लिकार्जुन खरगे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नसीम खान उपस्थित आहेत. तर राष्ट्रवादीकडून शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार, नवाब मलिक, छगन भुजबळ, सुनिल तटकरे होते.

शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये किमान समान कार्यक्रम ठरवला जात आहे. यासाठी दोन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांच्या दिल्लीमध्ये बैठका सुरु आहेत. याचवेळी तिन्ही पक्षांमधल्या सत्तास्थापनेच्या संभाव्य फॉर्म्युलाची चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह १६ मंत्रिपद, राष्ट्रवादी काँग्रेसला १५ मंत्रिपद आणि काँग्रेसला १२ मंत्रिपदं मिळू शकतात. तसंच अडीच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रिपद मिळू शकतं.

दरम्यान डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात गैरभाजप सरकार स्थापन होईल, अशी माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिलीय. पण शिवसेनेनं जातीय अजेंडा राबवला तर काँग्रेस सरकारमधून बाहेर पडेल, असं सांगितलं जातंय.