वडोदरा : विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण तोगडिया उद्या रविवारी २४ जून रोजी नव्या पार्टीची घोषणा करणार आहेत. तोगडिया यांची विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्ष पदावरुन उचलबांगडी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल चढवला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तोगडिया यांनी नरेंद्र मोदी सरकारला फटकारले आहे. मोदी यांना आपल्या आश्वासनांचा पाठपुरावा करण्यात आणि लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यात अपयश आल्याचा आरोप यावेळी तोगडिया यांनी केला. मोदींनी लोकांना मोठी स्वप्न दाखवलीत. मात्र, त्यांच्या पूर्तीसाठी काहीही प्रयत्न केलेले नाहीत. हे मोदींचे अपयश आहे, अशी टीका त्यांनी केलेय.


तसेच अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाचा मार्ग तयार करण्यास सरकारने संसदेत कायदे केले पाहिजे, अशी मागणी तोगडिया यांनी केली. त्याचवेळी त्यांनी गोहत्यांवर बंदी, कलम ३७० रद्द करुन जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा दिला पाहिजे आणि एकसमान नागरी संहितेची अंमलबजावणी करण्यात आली पाहिजे, अशी त्यांनी मागणी केलेय.


मोदींचे धोरण निराश करणारे आहे. मोदींच्या कारभारावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपशी संबंधित अनेक लोक नाराज आहेत. मोदी सरकारने वैचारिक, सामाजिक-राजकीय आणि आर्थिक मुद्यांवर काहीच केलेले नाही. हिंदुत्व विचारसरणीचे अनुकरण करणाऱ्यांनाच त्यांनी दुखावले आहे, असा हल्लाबोल तोगडिया यांनी केलाय.