मुंबई : हिवाळ्याच्या मोसमाला सुरुवात झालेली असतानाच देशाच्या उत्तरेकडे आता थंडीची लाट पसरल्याचं पाहायला मिळत आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि काश्मीर या भागांमध्ये तापमानाचा पारा चांगलाच खाली गेला आहे. काश्मीरमध्ये या मोसमातील पहिली  हिमवृष्टी झाली आहे. ज्यामुळे संपूर्ण खोऱ्यावर बर्फाची चादर पसरली आहे. ६ ते ८ नोव्हेंबर दरम्यान काश्मीरखोऱ्यात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेल्या या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन सज्ज झालं आहे. मुख्य म्हणजे पर्यटकांचा ओढा असणाऱ्या काश्मीरमध्ये सध्या अनेकांच्याच चेहऱ्यावर आनंद खुलल्याचं दिसत आहे. येथील नेक ठिकाणी पर्यटकांची गर्दी झाली आहे. हे पर्यटक काश्मीरमध्ये बर्फवृष्टीचा मनमुराद आनंद घेत आहेत.


काश्मीरशिवाय हिमाचल प्रदेशातील तापमानानेही निच्चांक गाठला आहे. ज्यामुळे येथील पर्वतीय भागांत मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली. सगळीकडे बर्फ आणि झोंबणारी थंडी, असंच चित्र हिमाचलमध्ये पाहायला मिळत आहे. हिमाचलमध्ये येणाऱ्या हिमालय पर्वतरांगांच्या कुशीत असणाऱ्या लाहौल स्पीतीच्या खोऱ्याचही बर्फ वर्षाव होत असल्यामुळे इथं तापमान, उणे १७ अंश सेल्सियसवर पोहोचलं आहे. 



गेल्या पाच दिवसांपासून येथे बर्फवृष्टी होत आहे. परिणामी पर्यटकांना काही अडचणींचा सामनाही करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या या बर्फवृष्टीमुळे रोहतांग पास येथील रस्त्यांवरी बर्फ हटवण्याचं काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आलं आहे.  या ठिकाणी येत्या तीन दिवसांतही प्रचंड हिमवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.