)
Mumbai Goa Highway Date: 10वर्षांपासून जास्त काळ काम सुरू असणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. बहुप्रतीक्षित मुंबई गोवा महामार्ग कधी सुरू होणार याची सगळेच कोकणवासिय तसंच, मुंबईकरही मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. आता लोकसभेतच मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्ग कधी सुरू होणार? याची नवी डेडलाइन दिली आहे.
एप्रिल 2026 आधी मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल, अशी माहिती लोकसभेत नितीन गडकरींनी दिली आहे. लोकसभेत ठाकरे सेनेचे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी विचारलेल्या प्रश्नावर गडकरींनी हे उत्तर दिलं आहे. त्यामुळं मुंबई- गोवा महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी आता एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
'मुंबई गोवा महामार्गाचे काम गेल्या 10 वर्षांपासून सुरू आहेच. चंद्रावर जाण्यासाठी जितका खर्च झाला नाही त्यापेक्षा जास्त खर्च या महामार्गासाठी झाला आहे. तरीही आजपर्यंत हा रस्ता पूर्ण झालेला नाही. त्यामुळं रस्त्याच्या या कामात तुम्ही वैयक्तिरित्या लक्ष घातलाच तरच काम होईल. गेल्या कित्येक वर्षांपासून काम सुरू आहे त्यामुळं नागरिकही आता वैतागले आहेत. हे काम पूर्ण कधी होणार?' असा प्रश्न खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत गडकरींना केला होता.
'खासदार अरविंद सावंत यांच्या प्रश्नावर उत्तर देताना गडकरींनी म्हटलं आहे की, या रस्त्याचे काम 2009मध्ये सुरू झालं आणि मी मंत्री 2014 साली झालो. त्यामुळं जुन्या सरकारने सार्वजनिक बांधकाम विभागाला याचे काम दिले होते. येथे भूसंपादनाच्या समस्या होत्या. आत्तापर्यंत खूप कंत्राटदार बदलले त्याचे काय कारण हे कळू शकले नाही. अनेकदा कारवाईही करण्यात आली.'
'मुंबई गोवा महामार्गाचे 89 टक्के काम पूर्ण झाले आहे. यावर्षी एप्रिलपर्यंत संपूर्ण रस्ता तयार होईल आणि नागरिकांचा त्रासही संपेल, असं गडकरींनी म्हटलं आहे. तसंच, या महामार्गाला खूप विलंब झाला हेदेखील मी स्वीकार करतो,' असंही त्यांनी म्हटलं आहे.
या महामार्गाचे काम १० वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून सुरू आहे.
नितीन गडकरी यांनी घोषणा केली आहे की, एप्रिल २०२६ पूर्वी मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल.
त्यांनी लोकसभेत ठाकरे सेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ही माहिती दिली.