इतका आटापिटा कशासाठी? महाराष्ट्रातील वाढत्या घटस्फोटांमागची कारणं वाचून हाच प्रश्न मनात घर करेल

Social Media Impact on Relationships : नातेसंबंधांवर परिणाम करतोय दैनंदिन जीवनातील हा घटक... क्षणाक्षणाला कैक नाती येतायत धोक्यात... 

सायली पाटील | Updated: Mar 18, 2025, 10:27 AM IST
इतका आटापिटा कशासाठी? महाराष्ट्रातील वाढत्या घटस्फोटांमागची कारणं वाचून हाच प्रश्न मनात घर करेल
excessive use of social media rises divorce cases in maharashtra relationship news updates

Social Media Impact on Relationships : सोशल मीडियामुळं जग खऱ्या अर्थानं जवळ आलं असं म्हटलं जात आहे. दर दिवशी, किंबहुना क्षणाक्षणाला याची प्रचितीसुद्धा येत आहे. कैक वर्षांपासूनचे दुरावलेले मित्र नकळत याच वर्तुळात भेटत आहेत. पण, एकिकडे ही नाती नव्यानं आकारास येत असतानाच दुसरीकडे मात्र याच सोशल मीडियामुळं नात्यांमध्ये दुरावासुद्धा येत आहे. हे नातं म्हणजे पती- पत्नीचं विवाहबंधनाचं नातं. 

सोशल मीडियाच्या या नाण्याच्याही दोन बाजू असून ज्याप्रमाणे त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात अगदी त्याचप्रणाणे नकारात्मक परिणामही असून, मागील तीन वर्षांमध्ये एकट्या महाराष्ट्रात याच कारणास्तव होणाऱ्या घटस्फोटांच्या संख्येत तीन पटींनी वाढ झाल्याची बाब एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. देशात सर्वाधिक घटस्फोट हे एकट्या महाराष्ट्रात होत असल्याची बाबसुद्धा इथं समोर आली आहे. 

'कम्प्युटर्स इन ह्यूमन बिहेवियर'मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या 'एडजुआ लीगल्स गुगल अॅनालिटिक 2025'च्या निरीक्षणानंतर सादर करण्यात आलेल्या या अहवालाच्या माध्यमातून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मुंबईसह दिल्ली, बंगळुरू, कोलकाता, लखनऊ, हैदराबाद यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये होणाऱ्या घटस्फोटांच्या प्रमाणात तिपटीनं भर पडलं असून यामागे काही महत्त्वाची कारणं असल्याची बाबही समोर आली. 

का वाढत आहेत घटस्फोट? 

देशातील मोठ्या शहरांतील अत्यंत व्यग्र आणि वेगवान जीवनशैलीमुळे अनेकांच्या आयुष्यात विविध स्तरावर तणाव सातत्यानं वाढत असून, नोकरदार पती किंवा पत्नीला वेळ कमी मिळत असल्या कारणानं नात्यांना वेळ देणे दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे. ही परिस्थिती या तणावात भर टाकताना दिसतेय. मोठा कार्यालयीन दिवस, न संपणारं काम, कामावर जाण्यासाठी खर्च होणारा वेळ, नोकरीच्या ठिकाणी असणारा दबाव आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठीची सततची स्पर्धा, त्यातूनच वाढता तणाव, वाढती महागाई, वाढता खर्च आणि हे सर्वकाही करत असताना आर्थिक जुळवाजुळवीची कसरत आणि ओघाओघानं येणारं कौटुंबिक जबाबदाऱ्यांचं ओझं यामुळे नात्यांमध्ये कळत नकळतच दुरावा निर्माण होत चालला आहे. ज्यामुळं ज्या भविष्यासाठी हा आटापिटा केला जात आहे त्याच्यामुळं जर नाती दुरावणार असतील तर हा आटापिटा नेमका कशासाठी, हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे.  

हेसुद्धा वाचा : 'इतरांच्या नजरेत तुम्ही कायम...' विराट BCCI वर संतापताच अनुष्काची सूचक पोस्ट; शब्दन् शब्द विचार करायला लावणारा 

...म्हणून सोशल मीडिया घात करतेय 

सोशल मीडियाच्या सततच्या वापरामुळे वैवाहिक संबंध संशयाच्या भोवऱ्यात येत असून, पती पत्नीच्या नात्यात यामुळं दुरावा निर्माण होताना दिसत आहे. ज्यामुळं एकिकडे सारं जग जवळ येत असतानाच या व्हर्चुअल उपलब्धतेमुळं प्रत्यक्षातील नाती मात्र दिवसेंदिवस अधिक कमकुवत होताना आणि सरतेशेवटी घटस्फोटापर्यंतच्या टप्प्यावर पोहोचताना दिसत आहेत. 

परपुरुषाशी अश्लील चॅटिंग म्हणजे पतीचा छळ;  न्यायालयाचं निरीक्षण 

एकिकडे सोशल मीडियामुळं घटस्फोटांमध्ये भर पडत असल्याची वस्तूस्थिती असतानाच यासारखंच एक प्रकरण नुकतंच समोर आलं. लग्नानंतर पती किंवा पत्नी आपल्या मित्रांसोबत अश्लील संभाषण करू शकत नाहीत असं म्हणत कोणताही पती किंवा पत्नी मोबाइलवर परपुरुष किंवा परस्त्रीशी अश्लील चॅटिंग सहन करणार नाही, असं निरीक्षण इंदूर उच्च न्यायालयाने नोंदवलंय लग्नानंतर पती-पत्नी दोघांनाही मोबाइल वापरण्याचं स्वातंत्र्य असलं संवादाची पातळी सभ्य असावी हेच न्यायालयानं स्पष्ट केलं.