How To Fall Asleep Fast: झोप ही आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असते. झोप पूर्ण झाली नाही तर दिवसभराची पूर्ण कामे नीट होत नाहीत. संपूर्ण दिवसाला लागणारी उर्जादेखील मिळत नाही. मात्र, सध्याच्या गडबडीच्या जीवनशैलीमुळं पुरेशी झोप मिळत नाही. तसंच, कधी कधी अति ताण-तणाव असल्यास झोप येत नाही. यामागे अनेक कारणं असू शकतात. मात्र, रात्रीच्या शांत झोपेसाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.
रात्री शांत झोप येत नसेल तर त्यामागे अनेक कारण असू शकतात. व्यायामाची कमतरता, काही आजार किंवा झोपेचे वेळापत्रक बिघडणे, वयानुसार झोपेचे गणित बदलणे ही कारणेदेखील असू शकतात. पण शांत झोप येण्यासाठी आज आम्ही तुम्हाला 10 उपाय सांगणार आहोत.
1) वेळापत्रक सेट करा
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवसाचे एक रुटिन सेट केले जाते तसेच झोपेचेदेखील एक वेळापत्रक सेट करुन घ्या. उदा. पहाटे ५ ते रात्री ९ असं एक उद्दिष्ट ठेवा. म्हणजे पहाटे पाच वाजता उठल्यानंतर तुम्ही 9 पर्यंत झोपलेच पाहिजे असं ठरवा. हे वेळपत्रक दररोज पाळता आलं पाहिजे.
2) इतरवेळी झोपणे टाळावे
रात्री शांत झोप हवी असेल तर दिवसा झोपणे टाळावे. दिवसा झोपल्यामुळं रात्री झोप येत नाही. अनेकजण टिव्ही बघता बघता, पुस्तक वाचता वाचता झोपतात पण असे केल्याने तुमची रात्रीची झोप बिघडू शकते. जोपर्यंत रात्री तुमची झोपण्याची वेळ होत नाही तोपर्यंत झोपू नका.
3) व्यायाम करा
तुम्ही दिवसभर किती काम करता व किती थकता याचाही तुमच्या झोपेवर परिणाम होतो. व्यायाम केल्याने तुमची झोप सुधारते, असे एका अभ्यासक्रमात दिसून आले आहे. तसंच, जे व्यायाम करतात त्यांना रात्री पटकन झोप लागते.
4) मॉर्निंग वॉक
काही जण घर ते ऑफिस किंवा घरातच इतकंच त्यांचं फिरण असतं. अशावेळी या लोकांना रात्रीची झोप येणे खूप मुश्किल होते. त्यामुळं संपूर्ण दिवसातून बाहेर फिरण्यासाठी थोडा वेळ काढा. घराबाहेर 10 ते 15 मिनिटे तरी बाहेर फिरा. यामुळं चांगली झोप येते.
5) कॅफिन कमी करा
कॅफिन हे तुमच्या शरिरात 12 तासांपर्यंत राहते. त्याचा तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो. ज्यांना झोप येत नाही किंवा शांत झोप लागत नाही अशा लोकांनी कॅफिनपासून चार हात लांब राहावं. कॅफिन फक्त कॉफीतच नाही तर चहा, सोडा किंवा चॉकलेटमध्येही आढळते.
6) 3-2-1 स्ट्रॅटजी
उत्तम शांत झोपेसाठी 3-2-1 स्ट्रॅटजी वापरा.
झोपण्या अगोदर तीन तास खाणे थांबवा. जेव्हाही आपण जेवतो त्यात कर्बोदके असतात. तेव्हा आपले शरीर इंसुलिन सोडते आणि इंसुलिनची क्रिया आपल्या मेंदूला सांगते की आपण जागे आहोत,"
झोपण्याअगोदर 2 तास डिजीटल उपकरणांपासून लांब राहा. कारण फोन, टॅबलेटसारखी उपकरण तुमच्या डोळ्यांजवळ मेंदूला चालना देणारा प्रकाश उत्सर्जित करतात अशावेळी विश्रांतीऐवजी मेंदू तुम्हाला जागृत ठेवण्याचे संकेत देतो.
झोपण्याच्या 1 तास आधी: शांत आणि स्वस्थ बसा. ईमेल तपासणे किंवा सोशल मीडियावरून स्क्रोल करणे यासारखे तणाव निर्माण करणारी कोणतीही गोष्ट टाळा. तुमच्या मेंदूला आराम करण्यास आणि झोपेची तयारी करण्यास मदत करा.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)