Moong Dal Bhaji Recipe in Marathi: मूग डाळ ही प्रोटिन्सने भरलेली असून तिच्यापासून बनवलेली भजी खमंग, कुरकुरीत आणि पौष्टिकही असतात. जाणून घ्या रेसिपी

How to make moong dal pakoda: पावसाळा असो किंवा गुलाबी थंडी गरमागरम, कुरकुरीत पकोडे म्हणजे घराघरातील लाडका स्नॅक आहे. त्यातही मूगडाळ भजी हे चवीलाही छान आणि पचायला हलके असतात. मूग डाळ ही प्रोटिन्सने भरलेली असून तिच्यापासून बनवलेली भजी खमंग, कुरकुरीत आणि पौष्टिकही असतात. संध्याकाळच्या चहा सोबत किंवा पाहुण्यांना झटपट काहीतरी देण्याची वेळ आली, की हे पकोडे हमखास हिट ठरतात. चला तर मग, पाहूया ही सोपी आणि चवदार रेसिपी..
मूग डाळ – १ कप (४-५ तास भिजवलेली)
कांदा – १ मध्यम आकाराचा (बारीक चिरलेला)
आले – १ चमचा (बारीक किसलेले)
हिरव्या मिरच्या – २ (बारीक चिरलेल्या)
कोथिंबीर – २ चमचे (बारीक चिरलेली)
हळद – ¼ चमचा
लाल तिखट – ½ चमचा
जिरे – ½ चमचा
मीठ – चवीनुसार
बेकिंग सोडा – चिमूटभर (ऐच्छिक, कुरकुरीतपणासाठी)
तेल – तळण्यासाठी
भिजवलेली मूग डाळ चांगली धुऊन थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये थोडी जाडसर वाटून घ्या. फारस पातळ करू नका.
वाटलेली डाळ एका मोठ्या परातीत/बाउलमध्ये काढा.
त्यात चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, आले, कोथिंबीर, हळद, लाल तिखट, जिरे, आणि मीठ घाला.
हवं असल्यास चिमूटभर बेकिंग सोडा घालू शकता.
सर्व मिश्रण एकत्र करून १० मिनिटे झाकून ठेवा.
कढईत तेल गरम करत ठेवा. मध्यम आचेवर गरम होऊ द्या.
गरम तेलात चमच्याने किंवा हाताने थोडं थोडं मिश्रण घेऊन भजी सोडा.
पकोडे सोनेरी व कुरकुरीत होईपर्यंत मध्यम आचेवर तळून घ्या.
तळून झाल्यावर किचन पेपरवर काढा, म्हणजे जास्तीचं तेल शोषून घेतलं जाईल.
गरमागरम मूग डाळीची भजी तांदळाच्या चटणी, कोथिंबीर चटणी किंवा सॉस बरोबर सर्व्ह करा.
चहा बरोबर खूपच छान लागतात.