घरच्या घरी बनवा बाजारापेक्षा चविष्ट पाणीपुरी; चवीसोबतच फायदे ही जाणून घ्या

पाणीपुरी म्हणजे सगळ्यांच्या आवडते स्ट्रीट फूड आहे. ही पाणीपुरी घरीच तयार करु शकतात. जाणून घेऊयात चटपटीत पाणीपुरीची रेसिपी.

Intern | Updated: May 17, 2025, 05:44 PM IST
घरच्या घरी बनवा बाजारापेक्षा चविष्ट पाणीपुरी; चवीसोबतच फायदे ही जाणून घ्या

Panipuri Recipe: रस्त्याच्या कडेला पाणीपुरीची गाडी दिसली, की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची पावले तिकडे वळतात. तिची तिखट, आंबट, गोड चव सर्वांनाच भुरळ घालते. पण बाजारात मिळणाऱ्या पाणीपुरीबद्दल अनेक वेळा स्वच्छतेबाबत शंका असते. म्हणूनच, जर तुम्हाला तीच चव घरी आणि स्वच्छतेसह अनुभवायची असेल, तर ही खास रेसिपी नक्की करून पहा.

पाणीपुरीसाठी लागणारे साहित्य:
पुरीसाठी: रवा 1 कप, मैदा 2 टीस्पून, मीठ , पाणी, तेल

तिखट पाण्यासाठी: पुदिना- 1 कप, कोथिंबीर – 1/2 कप, हिरव्या मिरच्या- 2, आलं-1 तुकडा, चिंचेचा कोळ - 2 टेबलस्पून, भाजलेले जिरे- 1 टीस्पून, काळं मीठ आणि पांढरं मीठ, थंड पाणी

पुरीच्या सारणासाठी: 2 उकडलेले बटाटे, उकडलेले चणे/वाटाणे- 1/2 कप, मीठ, मिरची, चाट मसाला - चवीनुसार

कृती (पाणीपुरी बनवण्याची पद्धत):
1. पुरी तयार करण्याची पद्धत:
एका परातीत 1 कप रवा, 2 चमचे मैदा आणि चवीनुसार मीठ घालून एकत्र करा.
त्यात थोडं-थोडं पाणी घालून घट्टसर पीठ मळा. हे पीठ अर्धा तास झाकून बाजूला ठेवा.
30 मिनिटांनी पीठाचे छोटे छोटे गोळे करा. त्यामधून छोट्या, पातळ आणि एकसारख्या आकाराच्या पुऱ्या लाटून घ्या.
कढईत तेल गरम करा आणि या पुऱ्या मध्यम आचेवर कुरकुरीत आणि फुगेपर्यंत तळा.
तळलेल्या पुऱ्या एका टिश्यू पेपरवर काढा जेणेकरून अतिरिक्त तेल निघून जाईल.

2.पाणीपुरीचे पाणी तयार करण्याची पद्धत:
1 कप पुदिना,1/2 कप कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, 1 टीस्पून भाजलेले जिरे, 1/2 टीस्पून काळं मीठ, चवीनुसार पांढरं मीठ आणि 1 टीस्पून पाणीपुरी मसाला हे सर्व मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्या. हे वाटण गाळून घ्या, जेणेकरून पाणी गुळगुळीत आणि स्वच्छ राहील. त्यात 2 टेबलस्पून चिंचेचा कोळ घालून व्यवस्थित मिसळा. गोडसर चव हवी असल्यास त्यात थोडं गूळाचे पाणी (गूळ पाण्यात विरघळवलेलं) घालू शकता. हे सर्व एकत्र करून 4 कप थंड पाणी घाला. हवे असल्यास बर्फाचे तुकडे टाका.

3. सारण तयार करण्याची पद्धत:
2 मध्यम उकडलेले बटाटे सोलून कुस्करून घ्या. त्यात 1/2 कप उकडलेले चणे किंवा वाटाणे घाला. वरून मीठ, तिखट, चाट मसाला किंवा चवीनुसार हवे तसे मसाले मिसळा. सर्व घटक एकत्र करून सारण तयार ठेवा.

4. पाणीपुरी सर्व्ह करण्याची पद्धत:
एका पुरीला हलक्या हाताने फोडा. त्यात थोडं सारण भरा. ती पुरी तयार केलेल्या पाण्यात बुडवा आणि लगेच खा.

फायदे:
पचनास मदत: पुदिना, चिंच आणि काळ्या मिठामुळे पचनक्रिया सुधारते.
हायजिन आणि कमी तेल: घरी बनवलेली पाणीपुरी अधिक स्वच्छ आणि हेल्दी असते.
हायड्रेशन: उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी उपयुक्त असते.
लो-कॅलरी नाश्ता: भूक भागवणारा, हलकाफुलका आणि टेस्टी पर्याय आहे.