बाजारात मिळणाऱ्या चिली ऑईलपेक्षा घरगुती चिली ऑईल अधिक आरोग्यदायी आणि चविष्ट असते. चिली आईल हे तुम्ही अनेक पदार्थांमध्ये वापरू शकतात. पाहूयात ही सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी.
साहित्य:
चिली मिक्ससाठी:
हिरव्या मिरच्या- 100 ग्रॅम
किसलेले लसूण- 1 टेबलस्पून
किसलेले आले- 1 टेबलस्पून
चवीनुसार मीठ
साखर- 1 टीस्पून
ऑइस्टर सॉस- 1 टेबलस्पून (शाकाहारी पर्यायासाठी सोया सॉस वापरू शकता)
चिली फ्लेक्स- 2 टेबलस्पून
तीळ- 1 टेबलस्पून
दाण्याचा कूट- 1 टेबलस्पून
तेलासाठी लागणारे साहित्य:
चिरलेला कांदा - 1/4 कप
कांद्याची पात- 5-6
चिरलेले गाजर - 1
कोथिंबीर - 1 मूठ
तमालपत्र - 2
चक्रफूल - 2
लवंग- 4-5
तेल - 1/2 कप
कृती:
हिरव्या मिरच्या चॉपरमध्ये बारीक चिरून एका काचेच्या भांड्यात घ्या. त्यात लसूण, आले, मीठ, साखर, ऑइस्टर सॉस किंवा सोया सॉस, चिली फ्लेक्स, तीळ आणि दाण्याचे कूट घालून सर्व नीट मिसळा.
एका खोल कढईत तेल गरम करा. त्यात कांदा,कांद्याची पात, गाजर, कोथिंबीर, तमालपत्र, चक्रफूल आणि लवंगा घालून सर्व साहित्य मध्यम आचेवर डीप फ्राय करा. भाज्या खरपूस होईपर्यंत परतून घ्या.
भाज्यांचे तुकडे तेलातून काढून वेगळे ठेवा. उरलेले गरम तेल चिली मिक्सवर ओता आणि सगळं नीट एकजीव करा. मिश्रण थोडं थंड झाल्यावर काचेच्या स्वच्छ बरणीत भरून ठेवा. फ्रिजमध्ये ठेवल्यास 15 दिवस टिकते.
वापर:
- रामेन, फ्राईड राईस, पराठा, टोस्ट, सँडविच, चायनीज ग्रेव्हीज, स्टर फ्राय भाज्या किंवा अगदी सूपवरही चव वाढवण्यासाठी हे चिली ऑईल वापरू शकता.
- एक चमचा चिली ऑईल साध्या भाजीला देखील चवदार बनवू शकतं.
टीप्स:
- अधिक झणझणीत चव हवी असल्यास तिखट मिरच्या वापराव्यात.
- तेल शक्यतो बिनवासाचे किंवा सुगंधी तेल (जसे तीळ तेल) वापरा, त्यामुळे चव अधिक खुलते.
- तळलेले मसाले आणि भाज्या फेकून न देता, त्या आपण इतर भाज्यांमध्ये वापरू शकतो.
चिली ऑईल ही एक बहुपयोगी आणि चवदार चटणी आहे. जी फक्त काही साध्या घटकांमध्ये घरीही सहज तयार करता येते. याचे वैशिष्ट्य म्हणजे झणझणीतपणा आणि त्यात असलेले मसाल्यांचे भरपूर फ्लेव्हर्स. चायनीज पदार्थ प्रेमींनी हे एकदा नक्की करून पाहावे.