'आईला सगळं जमतं'; मल्टीटास्किंग करणाऱ्या आईवर काय होतो परिणाम?

'मल्टिटास्किंग करणं योग्य की अयोग्य''? मदर्स डे' निमित्त विचार करायला लावणारा प्रश्न...   

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: May 11, 2025, 10:56 PM IST
'आईला सगळं जमतं'; मल्टीटास्किंग करणाऱ्या आईवर काय होतो परिणाम?

आई शिवाय आपलं पानही हलत नाही... याचा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाला येतो. प्रत्येक घरात आई ही अशी व्यक्ती आहे जिला सगळ्यातल सगळ जमतं. आई हे मल्टिटास्किंग करणारं एक उत्तम उदाहरण आहे, असं म्हटलं जातं. पण याच आईवर मल्टिटास्किंगचा काय परिणाम होतो, याचा कधी विचार केला आहे का? हा प्रश्न सायकोलॉजिस्ट आणि थेरपिस्ट नेहा भाटवडेकर यांनी सगळ्यांना विचारला आहे. 

मल्टिटास्किंग म्हणजे एकाच वेळेला अनेक काम चोखपणे पार पाडणे. प्रत्येक घरातील आई ही जबाबदारी अतिशय उत्तमपणे सांभाळत असते. आज मदर्स डे च्या निमित्ताने आईवर मल्टिटास्किंग करण्याचा काय परिणाम होतो ते पाहणार आहोत. 

आई घरातल्या सगळ्यांच्या आधी उठते – नाश्ता, शाळेची तयारी, ऑफिसची मिटिंग, वृद्ध आई-वडीलांची काळजी आणि कुठेतरी त्यामध्ये स्वतःला हरवून बसते. आजच्या गतिमान जगात, 'मल्टिटास्किंग म्हणजेच आईपण' असं समीकरण झालंय. हे तिचं सामर्थ्य म्हणून ओळखलं जातं. पण या सगळ्या जबाबदाऱ्यांखाली तिच मानसिक आरोग्य कसं आहे, हे कुणी विचारतं का?

“सगळं काही” करत राहण्याची भावनिक किंमत

मल्टिटास्किंग बाहेरून पाहायला जरी कार्यक्षम वाटत असली, तरी भावनिकदृष्ट्या ती खूप थकवणारी असते. सतत वेगवेगळ्या भूमिका पार पाडताना – आई, कर्मचारी, काळजीवाहू, जोडीदार – स्त्रिया अनेकदा स्वतःला विसरतात. सतत इतरांची काळजी घेताना स्वतःकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्यावर तणाव, चिंता, आणि भावनिक थकवा निर्माण होतो.

मानसिक ताण आणि बर्नआऊट

संशोधन असं सांगतं की, मेंदू एकाच वेळी अनेक जड कामांवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. जेव्हा आई एकीकडे मुलांचं गृहपाठ बघते आणि दुसरीकडे ऑफिसचे ईमेल्स तपासते, तेव्हा ती कुठल्याच कामात पूर्णपणे उपस्थित राहू शकत नाही. यामुळे थकवा वाढतो आणि कार्यक्षमता कमी होते. दीर्घकाळ असं सुरू राहिल्यास बर्नआऊट होण्याची शक्यता वाढते.

"सुपरमॉम"चा चुकीचा आदर्श

सगळ्यांचं सगळं सांभाळण्याची अपेक्षा ही चुकीची असूनही, समाजात ती स्तुतीस पात्र ठरते. परंतु अशी आई, जी सतत सगळं सांभाळते, तिला विश्रांती, आधार आणि सन्मान फार कमी मिळतो. सोशल मीडियावर दिसणाऱ्या परिपूर्ण क्षणांमागे असतात अपुरी झोप, गोंधळलेलं मन आणि स्वतःकडे लक्ष देण्याची तीव्र गरज.

काय करता येईल?

मन लावून एकवेळचं एक काम (सिंगल-टास्किंग): शक्य असल्यास एकावेळी एकच काम केल्याने मानसिक ताण कमी होतो.
मर्यादा ओळखणं: "नाही" म्हणणं, मदत मागणं, आणि जबाबदाऱ्या वाटून घेणं गरजेचं आहे.
स्वतःशी संवाद: "मी कशी आहे?" हा प्रश्न वेळोवेळी स्वतःला विचारणं फार महत्त्वाचं आहे.
समूह व आधार: अशा जागा शोधा किंवा तयार करा जिथे आई आपल्या भावना शेअर करू शकेल.

खास सल्ला 

या मातृदिनी आणि मानसिक आरोग्य दिनी, आईला तिच्या कामासाठी नाही, तर तिच्या काळजीसाठी आणि स्वतःच्या देखभालीसाठीही सन्मान द्या. खरं सामर्थ्य हे सतत सगळं करत राहण्यात नसतं, तर वेळोवेळी थांबण्यात, स्वतःच्या मनाकडे लक्ष देण्यात असतं. कारण आईचं मनसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे – जितकं तिचं प्रेम, असा प्रेमळ सल्ला नेहा भाटवडेकर यांनी दिला आहे.