महिला की पुरुष, कोणाला जास्त झोपेची गरज आहे आणि का? नवीन अभ्यासात धक्कादायक खुलासा

सर्वसामान्यांना काय हा प्रश्न पडतो की पुरुषांना की महिलांना कोणाला जास्त झोपेची गरज असते? तुमच्या या प्रश्नाचं उत्तर एका नवीन अभ्यासातून गूढ उलगडण्यात आलंय.   

नेहा चौधरी | Updated: May 12, 2025, 05:00 PM IST
महिला की पुरुष, कोणाला जास्त झोपेची गरज आहे आणि का? नवीन अभ्यासात धक्कादायक खुलासा

सर्वसाधारण आपण पुरुषांना सर्वाधिक झोपताना पाहिलं आहे. महिलांना असलेली कामं आणि ऑफिस-घरातील कामांची तारेवरील कसरत, मुलांसोबत घरातील मंडळांची जबाबदारी अशा अनेक गोष्टींमुळे महिला या साधारण फार कमी तास झोपतात. पण वैज्ञानिकदृष्टीकोनातून महिला की पुरुष नेमकं कोणाला सर्वाधिक झोपेची गरज असते, असा सर्वसाधारण प्रश्न अनेकांना पडतो. याच प्रश्नाचं उत्तर एका नव्या संशोधनातून उलगडण्यात आलं आहे. या रिपोर्टनुसार एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. (Who needs more sleep women or men and why New study reveals shocking truth)

महिला की पुरुष, कोणाला जास्त झोपेची गरज आहे आणि का?

नवीन अभ्यासातून असं दिसून आलंय की, महिलांना पुरुषांपेक्षा जास्त झोपेची आवश्यकता असते. कारण त्यांचे मेंदू दिवसभर अधिक सक्रिय आणि जटिल पद्धतीने काम करत असतं. ड्यूक विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या या अभ्यासातून असा निष्कर्ष निघाला आहे की झोपेच्या कमतरतेमुळे पुरुषांपेक्षा महिलांमध्ये मानसिक ताण, नैराश्य, राग आणि शत्रुत्वाचे प्रमाण जास्त वाढताना दिसतं. 

या अभ्यासानुसार, महिलांचा मेंदू एकाच वेळी अनेक कामे (मल्टीटास्किंग) हाताळतो, म्हणूनच त्या दिवसभर अधिक मेंदूची शक्ती वापरतात. याचा अर्थ असा की त्यांच्या मेंदूला पुरूषांपेक्षा योग्यरित्या विश्रांती घेण्यासाठी आणि दिवसभराच्या कामांमधून बरे होण्यासाठी जास्त वेळ लागत असतो. 

याशिवा., महिलांना त्यांच्या आयुष्यात मासिक पाळी, गर्भधारणा आणि रजोनिवृत्ती यासारख्या अनेक वेळा हार्मोनल बदलांना सामोरे जावे लागतं. या बदलांचा त्यांच्या झोपेच्या पद्धतींवरही परिणाम होतो आणि त्यांना चांगल्या आणि अधिक झोपेची गरज वाढते.

शरीरावर होतो चुकीचा परिणाम 

ड्यूक विद्यापीठाच्या या अभ्यासात असं म्हटलं गेलं आहे की, झोपेच्या कमतरतेमुळे महिलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम पाहिला मिळतो. जेव्हा त्यांना पुरेशी झोप मिळत नाही तेव्हा त्यांना चिंता, नैराश्य आणि चिडचिडेपणासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. पुरुषांपेक्षा महिलांवर याचा खोलवर परिणाम होतो, कारण त्यांचे मेंदू अधिक जटिल आणि सक्रिय असतात.

महिलांना दररोज किती तास झोपावे?

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, महिलांना दररोज किमान 7 ते 9 तासांची झोप आवश्यक आहे, जेणेकरून त्यांचे मन आणि शरीर पूर्णपणे बरे होण्यास मदत मिळते. त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य एवढ्या तासांची झोप आवश्यक आहे. चांगली झोप महिलांना तणावाशी लढण्यास मदत करते आणि त्यांचे एकूण आरोग्य सुधारण्यास फायदा होतो. या अभ्यासातून हे स्पष्ट होते की महिलांच्या झोपेच्या गरजा पुरुषांपेक्षा वेगळ्या असतात आणि हे लक्षात घेऊन, त्यांना त्यांच्या जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे जेणेकरून त्या निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यास मदत मिळते. 

पुरुष आणि महिलांच्या झोपेत काय फरक आहे?

1. गाढ झोप

महिला पुरुषांपेक्षा जास्त गाढ झोप घेतात, त्यामुळे त्यांचे शरीर आणि मेंदू लवकर रिचार्ज होतो, पण जर त्यांची झोप वारंवार खंडित होत असेल तर त्याचा जास्त परिणाम होतो.

2. झोपेचा कालावधी आणि गुणवत्ता

सरासरी, महिलांना 7 ते 9 तासांची झोप आवश्यक असते, तर पुरुषांसाठी 7 - 8 तास पुरेसे मानले जातात. याशिवाय, महिला अधिक REM (रॅपिड आय मूव्हमेंट) झोप घेतात, जी स्वप्न पाहण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असते.

3. झोपेचे विकार

पुरुषांपेक्षा महिलांना निद्रानाशाचा त्रास 40% जास्त होतो. याची कारणे हार्मोनल बदल, ताणतणाव, गर्भधारणा आणि मासिक पाळी असू शकतात.

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)