२ उपमुख्यमंत्री आणि १४-१४ मंत्री असा आहे काँग्रेसचा सत्तास्थापनेचा प्रस्ताव?
सत्तास्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र...
मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरु आहे. भाजपसोबत सत्तास्थापनेचा तिढा कायम असल्याने शिवसेना आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत मिळून सत्तास्थापन करण्य़ाच्या मार्गावर आहे. काही वेळेतच हे चित्र स्पष्ट होईल. शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठका सुरु आहेत. शिवसेनेचे नेते काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा करण्यासाठी दिल्लीत पोहोचले आहेत. यावेळी काँग्रेसने महाराष्ट्र सरकारमध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी १-१ उपमुख्यमंत्री आणि १४-१४ मंत्रीपद असा फॉर्म्युला तयार केल्याचं कळतं आहे. अशी माहिती एका हिंदी वृत्तवाहिनीने दिली आहे.
काँग्रेसची सकाळी वर्किंग कमिटीची बैठक झाल्यानंतर पुन्हा महाराष्ट्रातील नेत्यांसोबत चर्चा केली जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील ६ नेते दिल्लीला पोहोचले आहेत. तर राष्ट्रवादीची देखील एक बैठक झाल्यानंतर काँग्रेसच्या निर्णयानंतर आम्ही निर्णय़ घेऊ असं प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यातही दुपारी बैठक झाली. या बैठकीत दोन्ही नेत्य़ामध्ये सरकार स्थापनेबद्दल चर्चा झाल्याचं समजतं आहे. यावेळी आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते.
संध्य़ाकाळी ६ वाजता शिवसेनेचे नेते राज्यपालांना भेटण्यासाठी जाणार आहेत. शिवसेनेला आज संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी वेळ देण्यात आली आहे.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी नवी आघाडी आता राज्यात पाहायला मिळणार आहे. शिवसेना एनडीएमधून बाहेर पडली आहे. शिवसेनेचे केंद्रातील मंत्री अरविंद सावंत यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.