Pune Crime News: पुण्यात बापानेच पोटच्या मुलीची अत्यंत निर्दयीपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी शांताराम चव्हाण आणि चिंगू भोसले यांना अटक केली आहे.

Pune Crime News: पुण्यात एकीकडे भोर तालुक्यात चिमुरडीवर बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे. एका 4 वर्षाच्या चिमुरडीसोबत इतकं निर्दयी कृत्य एखादी व्यक्ती आणि तीदेखील 75 वर्षांची कशी काय करु शकते या विचाराने प्रत्येकजण संताप व्यक्त करत आहे. त्यातच पुण्यात आता बापानेच आपल्या पोटच्या मुलीची निर्दयीपणे हत्या केल्याचं समोर आलं आहे. हत्या इतक्या भयानक पद्धतीने करण्यात आली आहे की, हा बाप आहे की हैवान असा प्रश्न तुम्हालाही पडेल.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात बापाने लाकडं कापण्याच्या मशीनने आपल्या मुलीची हत्या केली आहे. देऊळगाव राजे हद्दीत हनुमान वस्ती, काळे वस्तीजवळ हा प्रकार घडला आहे. ही मुलगी फक्त 9 वर्षांची आहे. मुलीने तिच्या भावाच्या शाळेच्या गुणपत्रिकेवर खाडाखोड केली होती. हाच राग मनात धरुन जन्मदात्या पित्याने मुलीची लाकडं कापण्याच्या मशीनने हत्या केली. बापाने मुलीत्या गळ्यावर आणि डोक्यावर मशीन फिरवून अत्यंत निर्दयीपणे हत्या केली आहे.
अनामिका शांताराम चव्हाण असं मृत पावलेल्या 9 वर्षीय मुलीचं नाव आहे. यासंदर्भात दौंड पोलीस ठाण्यामध्ये आरोपी शांताराम दुर्योधन चव्हाण व चिंगु शिंदबाद भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दौंड पोलिसांनी या प्रकरणातील दोन्हीही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
पुण्यात किरकोळ वादातून 19 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे हत्या करणारे आरोपी अल्पवयीन आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.
कात्रज आंबेगाव परिसरात रात्री एका 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नयन सचिन जाधव असं मृत तरुणाचं नाव आहे.
या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने वेगाने चक्रं फिरवली. रात्रीच या गुन्ह्यात सहभागी असलेल्या 3 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. "चापट का मारली?" आणि "शिवीगाळ का केली?" या कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून नयनवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले, ज्यात त्याचा मृत्यू झाला.
देहूरोड परिसरात 29 एप्रिल रोजी गोळीबाराचा थरार झाला होता या गोळीबारात भाजपा कार्यकर्ता रमेश रेड्डी यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या केली होती. या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. या आरोपींनी ज्या भागात गोळीबार करत रमेश रेड्डीची हत्या केली त्याच भागात पोलिसांनी धिंड काढली.
रमेश रेड्डी यांच्यावर चार हल्लेखोरांनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली होती. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत देहूरोड पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि अखेर चार आरोपींना अटक करण्यात यश मिळवले.
पोलिसांनी कडक बंदोबस्तात आरोपींना घटनास्थळ परिसरात आणून त्यांची धिंड काढली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. पोलिसांनी या कारवाईद्वारे गुन्हेगारांवर वचक बसवण्याचा प्रयत्न केला.दरम्यान, या हत्येमागील नेमका हेतू काय होता, याचा शोध पोलिस घेत असून पुढील तपास सुरू आहे. आरोपींकडून अधिक माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.