जालन्यातील भोकरदन तालुक्यातील वालसा वडाळा गावातील ज्ञानेश्वर आहेर या 30 वर्षीय विवाहित व्यक्तीने लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दहा दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेनंतर आत्महत्या करणाऱ्या आहेर यांच्या पत्नी अंजना आहेर यांनी भोकरदन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करत एका भोंदूबाबाच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याचा आरोप केला होता. या तक्रारीच्या आधारे भोकरदन पोलिसांनी भोंदूबाबाला अटक करत त्याची चौकशी केली. यावेळी अनेक धक्कादायक खुलासे झाले असून, एकच खळबळ उडाली आहे.
ज्ञानेश्वर आहेर हे पत्नी अंजना आहेर आणि मुलीसोबत बुलढाणा जिल्ह्यातील चामनगाव या ठिकाणी दर्शनासाठी गेले असता आरोपी भोंदूबाबाशी त्यांची ओळख झाली होती. या ओळखीतून भोंदूबाबाने मोबाईल नंबर आणि गावाचा पत्ता घेतला होता. त्याची अंजना ज्ञानेश्वर आहेर हिच्यावर वाईट नजर होती. यातून त्याने फोन करणं आणि चिट्ठी पाठवत त्रास देण्यास सुरुवात केली. ज्ञानेश्वर याला फोन करून आणि चिठ्या पाठवून तुझी मुलगी ईश्वरी ही माझीच आहे. ईश्वरी मला पाहीजे नाहीतर मी तुमच्यावर 5 से 10 लाखाचा मानहाणीचा दावा दाखल करेल अशी धमकी तो देत होता. या त्रासाला कंटाळून आणि बदनामी होईल या भीतीने ज्ञानेश्वर यांनी आत्महत्या केल्याचं उघड झालं. यानंतर पोलिसांनी आरोपी भोंदूबाबा गणेश लोखंडे याची चौकशी केली असता त्याला गुप्त धनासाठी नरबळी देण्यासाठी पायाळू मुलगी हवी होती असं उघड झालं. त्यासाठी त्याने ईश्वरी हिची मागणी केली होती.
पती पत्नीनं यासाठी नकार दिल्याने या बाबाने एका वकिलामार्फत पती पत्नीला सहा लाखांची नोटीस बजावली होती. या भोंदू बाबाने नरबळीसाठी खड्डा करून ठेवल्याची धक्कादायक बाब पोलिस चौकशीत समोर आली आहे. त्यामुळे तो महिलेला ब्लॅकमेल करत होता. त्यातूनच घाबरलेल्या ज्ञानेश्वरने आत्महत्या केल्याचंही तपासात उघड झाल्याने भोकरदन पोलिसांनी आरोपी भोंदू बाबा गणेश लोखंडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या प्रकरणी आरोपीसोबत आणखी कोण होत का याचाही पोलीस तपास करत आहेत. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून भोकरदन पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत