...म्हणून तिने धावत्या रिक्षातून उडी मारली; संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
धावत्या रिक्षातून उडी मारल्याने तरुणीच्या डोक्याला जबर दुखापत झाली. तिला उचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर : दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडामुळे(Shraddha Murder Case) संपूर्ण देश हादरला असताना संभाजीनगरमधून(Sambhajinagar) धक्कादायक बातमी समोर आली आहे. रिक्षाचालकाकडून एका अल्पवयीन तरुणीची छेड काढण्यात आली. यामुळे घाबरलेल्या तरुणीने थेट धावत्या रिक्षातून बाहेर उडी मारली आहे.
रिक्षात बसलेल्या या मुलीशी रिक्षा चालकाने अश्लील भाषेत बोलायला सुरूवात करत छेड काढायचा प्रयत्न केला. तरुणीने त्याला विरोध केला. तेव्हा चालकानं रिक्षा जोरात पळवली. त्यामुळे घाबरलेल्या मुलीनं धावत्या रिक्षातूनच उडी मारली.
धावत्या रिक्षातून उडी मारल्याने तरुणीच्या डोक्याला जबर दुखापत झाली. तिला उचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
थरार CCTV कॅमेऱ्यात कैद
या संपूर्ण घटनेचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांनी 4 तासांत आोरपीला अटक केली आहे. सय्यद अकबर सय्यद हमील असे आरोपीचे नाव आहे. सीसीटीव्ही फुटेज मध्ये रिक्षाचा नंबर स्पष्ट दिसत नव्हता. मात्र, पोलिसांनी तरीही त्यांची पथक नेमत अनेक रिक्षावाल्यांची चौकशी केली. त्यातून आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. फक्त चार तासात क्रांती चौक पोलिसांनी या आरोपीला जेरबंद केले आहे.