Abhijeet Bichukle Announce New Party: बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या 23 उमेदवारांमध्ये अभिजीत बिचुकले यांचाही समावेश होता. या निवडणुकीत त्यांचं डिपॉझिटही जप्त झालं आहे.

Abhijeet Bichukle Announce New Party: बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा अपेक्षेप्रमाणे एकतर्फी विजय झाला आहे. दरम्यान हा विजय मिळवताना त्यांनी अजित पवारांच्या विजयाचा रेकॉर्ड मोडला आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे हो पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा असताना, अपक्षांमुळे मात्र निवडणूक घ्यावी लागली. सुनेत्रा पवारांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या 23 उमेदवारांमध्ये अभिजीत बिचुकले यांचाही समावेश होता. या निवडणुकीत त्यांचं डिपॉझिटही जप्त झालं आहे. मात्र या पराभवानंतरही त्यांनी 2029 मध्ये आपण मुख्यमंत्री ठरवणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. इतकंच काय तर आपला पक्ष स्थापन करणार असून, त्याचं नाव 'अखिल बहुजन समाज सेना' असेल असं जाहीर केलं आहे. मी मुद्द्यांवर लढतो आहे, मी महाराष्ट्राचा अँग्री यंग मॅन आहे असंही ते म्हणाले आहेत. सोशल मीडिया बंद करा, लायकी नाही तेदेखील तिथे येऊन बोलतात अशी मागणीच त्यांनी केली आहे.
"बारामतीमधील लोक भावनिक होते. त्या भावना आमच्याही होत्या. अजित पवारांचं निधन झाल्याने माझ्याही मनाला हुरहुर होती. त्यांनी माझं काही भलंही केलं नाही, आणि वाईटही केलं नाही. पण त्यांच्या निधनानंतर एफआयआर का झाली नाही? हाच मुद्दा मी घेतला होता. जर मृत्यू नैंसर्गिक असेल तर तसं सुनेत्रा पवारांच्या टीमने जाहीर करावं. आणि जर नैसर्गिक नसेल आणि घातपात असेल तर उकल झाली पाहिजे. वहिनींना मी जाहीरपणे सांगतो की, एफआयआर करा. जर त्यासंदर्भात एफआयआर होत नसेल तर सर्वसामान्यांचं काय?," अशी विचारणा त्यांनी 'झी 24 तास'शी संवाद साधताना केली आहे.
"विधानसभा, लोकसभेत कोणालाही न जुमानता माझी धोरणं राबवत आहे. आगामी काळात मला प्रयत्नशील राहायचं आहे. 2029 ची निवडणूक हे माझं ध्येय आहे. 2029 चा मुख्यमंत्री मीच ठरवणार आहे," असा विश्वासच त्यांनी व्यक्त केला आहे.
"सोशल मीडियावेल नालायक लोक आहेत. जन्मापासून माझी चमकोगिरी सुरु आहे. माझ्या बारशाला 1 हजार लोक जेवले होते. उदयनराजे भोसले हे माझे थोरले बंधू आहेत, हे सांगायला मला लाज वाटत नाही. यामुळे मी तोऱ्यात राहतो. मी जनतेसाठी कामं करतो. जे गुलाम मतदार आहेत, चमचे आहेत त्यांनी सुधारलं पाहिजे," असं त्यांनी म्हटलं आहे.
मी महाराष्ट्राला जनतेला दिशा आणि दशा देण्यासाठी लढत राहणार. 2029 ला माझा मुख्यमंत्री होणार, ते मी करुन दाखवणार आहे. भाजपा षडयंत्र रचत आहे ते थांबलं पाहिजे, अन्यथा महाराष्ट्राचा बिहार होईल. मी माझा महाराष्ट्र बिहार होऊ देणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.
"आता फक्त पक्षांतर केलं जात आहे. मी कधीच या गोष्टी केलेल्या नाहीत. जर कोणत्या पक्षात गेलो तर मरेपर्यंत सोडणार नाही. पण माझा पक्ष घेऊन येणार. मला माझा देश महत्त्वाचा आहे. डिपॉझिट म्हणून लाखोंची रक्कम गेली. मी माझ्या कष्टाचे पैसे घालवले आहेत. मी कोणत्याही चुकीच्या मार्गाने कमावले नाही. मी पक्ष फोडायला आलो तर सगळे फोडून टाकेन," असा इशाराच त्यांनी दिला आहे.