Aditi Tatkare and Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. महाराष्ट्र दिनी ध्वजवंदनाचा मान आदिती तटकरे यांना मिळाल्यानं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते नाराज झाले आहेत. तसंच आदिती तटकरेच रायगडच्या पालकमंत्री होणार अशा चर्चांना देखील राजकीय वर्तुळात तोंड फुटलं आहे. पाहूयात सविस्तर
गेल्या अनेक दिवसांपासून रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद सुरु आहे. अशातच आता रायगडच्या पालकमंत्रिपदावरून पुन्हा एकदा महायुतीत वादाची शक्यता आहे. कारण महाराष्ट्र दिनी आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांमध्ये पुन्हा एकदा नाराजी पाहायला मिळत आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती मिळाल्यानंतर 26 जानेवारीला ध्वजवंदनाचा मान हा आदिती तटकरे यांना देण्यात आला होता. त्यावेळी देखील शिवसेना नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान पुन्हा एकदा आदिती तटकरे यांना ध्वजवंदनाचा मान मिळाल्यानं शिवसेना नेत्यांनी खंत व्यक्त केली आहे.
आदिती तटकरे पालकमंत्री होणार?
महाराष्ट्र दिनी ध्वजवंदनाचा मान आदिती तटकरे यांना मिळाल्यामुळे पुन्हा एकदा त्याच रायगडच्या पालकमंत्री होणार अशा चर्चा सुरु आहे. अमित शाह रायगड दौऱ्यावर असताना सुनिल तटकरे यांच्या घरी लंच डिप्लोमसी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. दरम्यान यावेळी पालकमंत्रिपदावर चर्चा झाल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली होती. त्यामुळे पुन्हा एकदा आदिती तटकरे यांच्या गळ्यात पालकमंत्रिपदाची माळ पडणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
आदिती तटकरे यांना ध्वजवंदनाचा मान, हा रायगडचा अपमान असल्याचं महेंद्र दळवी यांनी म्हटलं आहे. महेंद्र दळवी यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर मंत्री योगेश कदम देखील आक्रमक झाले आहेत. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावलेच झाले पाहिजे असा इशारा योगेश कदम यांनी दिला आहे.
पालकमंत्रिपदाची घोषणा झाल्यानंतर आदिती तटकरे यांना रायगडचं पालकमंत्रिपद देण्यात आलं होतं. दरम्यान यानंतर शिवसेना नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्यामुळे रायगडच्या पालकमंत्रिदाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे मागील अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या पालकमंत्रिपदावर तोडगा कधी निघणार असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र, आता आदिती तटकरे यांना ध्वजवंदनाचा मान मिळाल्यामुळे त्याच रायगडच्या पालकमंत्री होणार अशा चर्चांना उधाण आलं आहे.