संजय गायकवाड फुकट बदनाम झाले; प्रशासनाकडून आमदार निवासातील कॅन्टिनला क्लिनचीट

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार निवासातील कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.   

सोनेश्वर पाटील | Updated: Oct 16, 2025, 09:24 PM IST
संजय गायकवाड फुकट बदनाम झाले; प्रशासनाकडून आमदार निवासातील कॅन्टिनला क्लिनचीट

Sanjay Gaikwad : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील शिवसेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी यंदाच्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. कारण होते कॅन्टीनमध्ये शिळे अन्न देण्यात आल्याचा आरोप. या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली होती.

Add Zee News as a Preferred Source

या मारहाण प्रकरणानंतर अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने अजिंठा केटरर्स या कॅन्टीनचा परवाना निलंबित केला होता. मात्र, अवघ्या एका महिन्याच्या आतच ही कारवाई मागे घेण्यात आली आहे.

FDA ची कारवाई आणि मागे घेतलेला निर्णय

या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनाने कॅन्टीनची तपासणी करून अन्नपदार्थांच्या साठवणुकीत आणि स्वच्छतेत त्रुटी असल्याचे सांगितले होते. त्यावरून कॅन्टीनचा परवाना तात्पुरता रद्द करण्यात आला.

तथापि, आता FDA ने आपला निर्णय बदलत कॅन्टीनला पुन्हा परवानगी दिली आहे. FDA आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितले की, आम्ही तपासणीदरम्यान घेतलेल्या अन्नपदार्थांच्या नमुन्यांचा दर्जा योग्य आढळला. उपाहारगृहाला स्वच्छता आणि नियमपालनाबाबत काही निर्देश देण्यात आले होते आणि त्यांनी त्याचे पालन केले आहे. त्यामुळे त्यांचा परवाना पुन्हा सुरू करण्यात आला.

राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय

या घटनेनंतर संजय गायकवाड यांच्या वर्तनावर मोठा वाद निर्माण झाला होता. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत विधानसभेत देखील चर्चा झाली होती. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणी चौकशी करून योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

मात्र, आता FDA च्या तपासणीत कोणतेही अवैध किंवा निकृष्ट अन्नपदार्थ आढळून आले नाहीत असे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. त्यामुळे या कारवाईचा हेतू ‘नावापुरता दबाव टाकण्यापुरताच होता का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही कर्मचारी संघटनांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. मारहाणीचा विषय बाजूला पडून दोषी कॅन्टीनला परवानगी मिळणे हे अन्यायकारक आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. तर दुसरीकडे, कॅन्टीन व्यवस्थापनाने म्हटले आहे की आम्ही नेहमी स्वच्छता आणि दर्जा राखतो. अन्नाची गुणवत्ता खराब नव्हती हेच तपासणीत स्पष्ट झाले आहे.

संजय गायकवाड यांच्या ‘शिळ्या अन्ना’वरील आक्षेपानंतर सुरू झालेले प्रकरण पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. एकीकडे मारहाणीचा आरोप कायम असताना दुसरीकडे FDA च्या मागे घेतलेल्या कारवाईमुळे या प्रकरणावर राजकीय दबाव आणि प्रशासकीय पारदर्शकतेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.

FAQ

संजय गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्यावर मारहाण का केली?

शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे बुलढाणा जिल्ह्यातील आमदार संजय गायकवाड यांनी जुलै २०२५ मधील पावसाळी अधिवेशनादरम्यान मुंबईतील आमदार निवासस्थान (आकाशवाणी) कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला मारहाण केली. कारण म्हणजे कॅन्टीनमध्ये शिळे डाळ आणि भात देण्यात आल्याचा आरोप. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि राज्यभर खळबळ उडाली.

FDA ने कॅन्टीनवर काय कारवाई केली?

घटनेच्या काही तासांतच अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने कॅन्टीन ऑपरेटर अजिंठा (अजंता) केटरर्सची तपासणी केली. तपासणीत ७९ उल्लंघने आढळली, ज्यात अन्न साठवणूक आणि स्वच्छतेत त्रुटी होत्या. त्यानुसार ९-१० जुलै २०२५ रोजी कॅन्टीनचा FSSAI परवाना तात्पुरता निलंबित (सस्पेंड) करण्यात आला आणि अन्नसेवा बंद करण्याचे आदेश दिले गेले.

FDA ने परवाना निलंबन का मागे घेतला?

अवघ्या सात दिवसांत, १६ जुलै २०२५ रोजी FDA ने परवाना पुन्हा सक्रिय केला. FDA आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितले की, तपासणीदरम्यान घेतलेल्या अन्न नमुन्यांचा दर्जा चांगला आढळला. कॅन्टीन व्यवस्थापनाने स्वच्छता आणि नियमपालनाबाबत दिलेले निर्देश पाळले असल्याने कारवाई मागे घेण्यात आली.

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More