Ahemdabad Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत मराठी प्रवाशांचाही समावेश? महाराष्ट्रातही व्यक्त होतीये हळहळ

Ahemdabad Plane Crash News in Marathi: गुजरातच्या अहमदाबादमध्ये प्रवासी विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. गेल्या काही दशकातील विमान दुर्घटनांपैकी ही एक मोठी दुर्घटना आहे.   

शिवराज यादव | Updated: Jun 12, 2025, 05:45 PM IST
Ahemdabad Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत मराठी प्रवाशांचाही समावेश? महाराष्ट्रातही व्यक्त होतीये हळहळ

Ahemdabad Plane Crash News in Marathi: गुजरातच्या अहमदाबादमध्ये प्रवासी विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. एअर इंडियाचे विमान AI171 दुर्घटनाग्रस्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. विमानात एकूण 242 प्रवासी प्रवास करत होते. यापैकी 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 1 कॅनेडियन आणि 7 पोर्तुगीज नागरिक आहेत. अहमदाबादहून लंडन गॅटविकला दुपारी 1.38 वाजता निघालेले हे विमान, बोईंग 787-8 होते. विमानात 242 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते, ज्यामधील 2 पायलट आणि 10 क्रू मेम्बर्स होते. या विमानात महाराष्ट्रातीलही प्रवासी होते, ज्यामुळे राज्यात हळहळ व्यक्त होत आहे. 

विमानातील प्रवाशांची यादी समोर आली असून, यामध्ये महाराष्ट्राचे तीन प्रवासी आणि एक क्रू सदस्य दिसत आहे. क्रू मेम्बरच्या यादीत अपर्णा महाडीक नाव आहे. तर प्रवाशांच्या यादीत मयूर अशोक पाटील, महादेव पवार आणि आशाबेन पवार ही मनराठी नावं दिसत आहे. नावांवरुन हे सर्व महाराष्ट्रातील असावं असं दिसत आहे, मात्र याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 

येथे क्लिक करुन वाचा प्रवाशांची यादी

नेमकं काय झालं?

अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान मेघानी नगरमध्ये दुर्घटनाग्रस्त झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विमानाने टेक ऑफ केल्यानंतर काही वेळातच दुर्घटनाग्रस्त झालं. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 7 गाड्या उपस्थित आहेत. प्राथमिक माहितीनुसार, विमानात 242 प्रवासी होते ज्यामध्ये 2 पायलट आणि 10 केबिन क्रू होते. हे एअर इंडियाच बोईंग 787-8 ड्रीमलाइनवर विमान होतं. 

ताज्या माहितीनुसार, बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला घटनास्थळी पाठवण्यात आलं आहे. बीएसएफचं पथकही घटनास्थळी दाखल झालं असून, बचावकार्यात सहभागी झालं आहे. हे विमान दिल्लीमधून अहमदाबादला पोहोचलं होतं आणि तेथून लंडनला रवाना होणार होतं. या दुर्घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांच्याशी चर्चा केली. मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री विजय रुपानीदेखील या विमानात होते. 

एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) नुसार, विमानाने रनवे क्रमांक 23 वरून दुपारी 1.39 वाजता उड्डाण केले. त्यानंतर, विमानाने ताबडतोब एटीसीला मे डेचा संदेश दिला. या संदेशाचा अर्थ असा की विमानात आपत्कालीन परिस्थिती आहे. यानंतर, एटीसीने विमानाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. रनवे क्रमांक 23 वरून उड्डाण केल्यानंतर लगेचच विमान विमानतळाच्या बाहेर जमिनीवर कोसळले.