महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा उलथापालथ? अजित पवारांकडून काकांचे कौतुक;पुन्हा एकदा मनोमिलन?

Ajit Pawar and Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनोमिलनाच्या चर्चा राज्याच्या राजकारणात जोरदार सुरू आहेत. 

प्रविण दाभोळकर | Updated: May 17, 2025, 09:18 PM IST
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा उलथापालथ? अजित पवारांकडून काकांचे कौतुक;पुन्हा एकदा मनोमिलन?
पवार एकत्र?

Ajit Pawar and Sharad Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात जोरदार सुरू आहे. त्यातच आतापर्यंत अनेकदा अजित पवारांकडून शरद पवारांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी वक्तव्य येताहेत. एकीकडे काका-पुतण्याच्या भेटी-गाठी वाढताहेत. आणि अशातच अजित पवार यांनी काका शरद पवारांच्या पुण्याईनं चांगलं चाललंय असं वक्तव्य केलंय. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनोमिलनाच्या चर्चा राज्याच्या राजकारणात जोरदार सुरू आहेत. मागील काही दिवसांपासून पवार-काका पुतण्यांच्या वाढत्या भेटी-गाठीमुळे मनोमिलनाच्या चर्चांचे वारे मोठ्या प्रमाणात वाहत होते. मात्र यासगळ्यात अजित दादांकडून काका शरद पवारांच्या कार्याचं कौतुक केलं जातंय. कृतज्ञता व्यक्त केली जातंय.आज पुन्हा एकदा अजित पवारांनी काका शरद पवारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केलीय. आजोबांच्या, वडिलांच्या आणि चुलत्याच्या पुण्याईनं माझं चांगलं चाललंय असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. बारामतीच्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका जाहीर सभेत ते बोलत होते.

याआधीही अजित पवार यांना अनेकदा काका शरद पवार यांची आठवण आल्याचं पाहायला मिळालं.. पिंपरी चिंचवडमधल्या कार्यक्रमात तर अजित पवार हेच आपलं दैवत होते आणि आहेत हे कबुल केलं होतं. तर बीडमध्ये काकांच्या आशिर्वादाने सगळं चांगलं चांगलं चाललंय असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे अनेकांच्या भूवयाही उचावल्या होत्या.. 

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवारांवरांनी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर परिस्थीती बदललीय. अजित पवार संधी मिळेल तेव्हा शरद पवारांचं कौतुक करताहेत. तर त्यांच्याबद्दल जाहिरपणे कृतज्ञताही व्यक्त करताहेत..त्यातच कधी कौटुंबिक कार्यक्रमात तर कधी सार्वजनिक कार्यक्रमात पवार काका पुतण्यांच्या भेटी वाढल्याचं पाहायला मिळतंय. त्यामळे पुन्हा एकदा मनोमिलनाच्या चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय.