अजित पवारांनी सांगितला विधानसभा उपाध्यक्षांच्या तिकीट कापण्याचा किस्सा, जयंत पाटलांची कोंडी

Ajit Pawar On Anna Bansode: पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभा अध्यक्षपदी  निवड करण्यात आली. 

मानसी क्षीरसागर | Updated: Mar 26, 2025, 08:10 PM IST
अजित पवारांनी सांगितला विधानसभा उपाध्यक्षांच्या तिकीट कापण्याचा किस्सा, जयंत पाटलांची कोंडी
Ajit Pawar secretly given a ticket to Anna Bansode at 2 am

Ajit Pawar On Anna Bansode: अण्णा बनसोडेंची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. दरम्यान यानंतर अभिनंदन प्रस्तावावेळी बोलताना अजित पवारांनी अण्णा बनसोडेंना दिलेल्या उमेदवारीचा किस्सा सांगितलां. दादांनी त्यांनी सांगितलेल्या किस्सानंतर जयंत पाटलांची चांगलीच कोंडी झाल्याचं दिसलं. दादांनी नेमकं काय सांगितलं पाहुयात. 

राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंची विधानसभा उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. बनसोडेंची निवड झाल्यानंतर अजित पवारांनी अण्णा बनसोडेंचं कौतुकही केलं. दरम्यान यानंतर अण्णा बनसोडेंना दिलेल्या उमेदवारीचा किस्सा सांगत दादांनी अनेक गुपीतं उघडी केलीत. दादांच्या या व्यूहरचनेमुळे सुलक्षणा शीलवंत यांची विधानसभेची संधी हुकल्याचं या किस्सामधून समोर आलं. दादांनी सांगितलेल्या या किस्स्यानंतर जयंत पाटलांनी देखील दादांना टोला लगावला आहे. 

रात्री 2 वाजता बनसोडेंना एबी फॉर्म दिला, सर्वात अगोदर भरायला लावला, असं अजित पवारांनी म्हटलं होतं. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर जयंत पाटलांनी हसत हसतच काय ठरलं हे बाहेर सांगायचं नसतं,मात्र, दादांना हे सर्व सांगून टाकलं, असा टोलादेखील लगावला आहे. 

अजित पवार काय म्हणाले?

मी रात्री 2 वाजता गुपचुप जाऊन अण्णा बनसोडेयांना एबी फॉर्म दिला आहे. ⁠जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष होते. त्यांना सांगितलं तर ते म्हणाले, तुम्हाला काय करायचं ते करा पण माझं नाव सांगू नका. अण्णा 17 हजार मतांनी निवडून आले. आज उपाध्यक्ष झाले. माझं ऐकलं तर राजकारणात फायदा होतो. विश्वजीत कदम आणि अमित देशमुख ऐकलं का? माझं ऐकलं तर फायदा होतो, अण्णा पण आता सभागृहात जबाबदारी असते. सभागृह सुरु होण्याच्या आधी यावा लागतं आणि संपायचा काही काळ थांबायचं असतं अशी माहिती देखील अजित पवार यांनी दिली आहे.

जयंत पाटील काय म्हणाले?

तिकीटे ठरवताना कुणाला काही सांगायचे नसते. दादांनी खुलेपणांने तिकडे गेल्यावर हे सांगितले..उलट आम्ही दोघांनीच पिपंपरीत दुसरे नाव ठरवले होते.पण दादांना तिकडे गेल्यावर घेराव घातला व अण्णांना तिकीट द्यायची मागणी केली.मग दादांनी एबी फॉर्म दुसरा घेवून अण्णांना दिला.शीलवंत यांना मी तसं कळवून फॉर्म भरू नका म्हणून सांगितले

अण्णा बनसोडेंवर बोलताना अजित पवारांनी एक सूचक वक्तव्य देखील केलं. माझं ऐकलं तर किती भलं होतं बघा. विश्वजीत कदम आणि अमित देशमुखांना उद्देशून अजित पवारांनी हे वक्तव्य केलं. दरम्यान दादांच्या या वक्तव्यानंतर विधानसभेत एकच हशा पिकला होता. 

अजित पवार त्यांच्या रोखठोक वक्तव्यासाठी ओळखले जातात. आजही त्यांनी विधानसभेत पक्षांतर्गत गुपीतं अगदी मनमोकळेपणाणे सर्वांसमोर उघडी केलीत. दरम्यान त्यांनी केलेल्या या विधानानंतर जयंत पाटलांची चांगलीच कोंडी झाल्याचं दिसलं. आणि ते जयंत पाटलांनी अजित पवारांच्या भाषणानंतर बोलूनही दाखवलं.