प्रशांत अनासपुरे, कैलाश पुरी/ पुणे :  संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आजोळघरी गांधीवाड्यातल्या मुक्कामानंतर आज आळंदीहून पुण्यात दाखल होणार आहे. माऊलींच्या पालखीचा पुण्यात दोन दिवस मुक्काम असेल, त्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पालखीचा पहिला विसावा फुलेनगर इथे आहे. संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वैष्णवांचा हा मेळा पुण्यनगरीत दाखल होईल. त्या आधी शनिवारी भक्तिरसाने चिंब झालेले वारकरी.. टाळ, मृदुगांचा गजर.. फडकणा-या भगव्या पताका अन माऊलीच्या जयघोषात माऊलींच्या पालखीनं आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. 


माऊलींच्या पालखीचा हा देखणा प्रस्थान सोहळा पाहण्यासाठी मंदिर परिसरात वारक-यांसह सा-यांचीच प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. तर आकुर्डीच्या मुक्कामा नंतर तुकोबांची पालखीही आज पुण्यात दाखल होणार आहे.. आज संध्याकाळच्या सुमारास तुकोबांची पालखी पुण्यात पोहोचेल असा अंदाज आहे.. या पालखी सोहळ्यासाठी पुणेकरांनी जय्यत तयारी केली.



 वारी नसून ती मानवतेची वारी 


आनंदवारीत ही केवळ एका धर्माची वारी नसून ती मानवतेची वारी आहे याची खात्री पटते ती अनगड वाली शहा दर्ग्यात... साडे तीन दशकाहून अधिक काळ सुरु असलेली ही परंपरा आजही कायम आहे. जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या प्रस्थानांनंतर अनगड वालिशा दर्ग्यातील विसावा आणि तिथं होत असलेली आरती पाहण्यासाठी वारकरी आवर्जुन उपस्थित असतात. 


नगड वालीशा हे तुकाराम महाराजांचे शिष्य मानले जातात. तुकाराम महाराज आणि अनगड वालीशा या दोन संतांच्या भेटीच प्रतिक म्हणून आजही याकडे पाहिलं जातं. 


सुरक्षितता हे सर्वात मोठं आव्हान



वारी सोहळ्यामध्ये वारक-यांची सुरक्षितता हे पोलिसांसमोरचं सर्वात मोठं आव्हान असतं. लाखो वारक-यांचा सहभाग असलेल्या या वारी सोहळ्याची जबाबदारी एक महिला पोलीस अधिकारी समर्थपणे सांभाळत आहे. कसा असतो हा सर्व बंदोबस्त आणि कसं असतं हे आव्हान या बाबत पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी माहिती दिली.