संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे दिल्लीकडं; मुख्यमंत्री कोण होणार हे अमित शाह ठरवणार?

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असा प्रश्न गल्लीपासून दिल्लीपर्यंत विचारला जातोय. महायुती सरकारचं नेतृत्व कोण करणार याची उत्सुकता महाराष्ट्राला लागलीये. अमित शाहा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवणार असल्याची माहिती आहे. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राचे दिल्लीकडं डोळे लागलेत.

वनिता कांबळे | Updated: Nov 25, 2024, 10:32 PM IST
संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे दिल्लीकडं; मुख्यमंत्री कोण होणार हे अमित शाह ठरवणार?  title=

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आली असली तरी महायुती सरकारचा मुख्यमंत्री कोण होणार याचं उत्तर अजून महाराष्ट्राच्या जनतेला मिळालेलं नाही. जनतेला जेवढी मुख्यमंत्रिपदाबाबत उत्सुकता आहे तेवढीच उत्सुकता आता महायुतीतल्या घटकपक्षांनाही लागलीये. फडणवीस यांच्याकडं महायुती सरकार चालवण्याचं कौशल्य असल्यानं त्यांनाच मुख्यमंत्री करा अशी मागणी प्रवीण दरेकरांनी केलीय.

देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं मावळते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सांगितलंय. शिवसेनेतूनही एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी पुढं येऊ लागलीये. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे दिल्लीत ठरणार आहे. अमित शाहा हे सर्व नेत्यांसोबत सल्लामसलत करुन मुख्यमंत्री ठरवतील. जेव्हा हे नाव निश्चित होईल तेव्हा महाराष्ट्रात दिमाखदार शपथविधी सोहळा होणार हे निश्चित आहे.

विधानसभा निकालानंतर एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षाकडून सर्वांधिकार देण्यात आले आहेत. शिवसेना विधिमंडळ पक्षाचे गटनेते, मुख्य प्रतोद, प्रतोद आणि इतर पदाधिकारी निवडण्याचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय, शिवसेना कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर, शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक, मुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यात हा निर्णय एकमतानं घेण्यात आला.