अयानची परिस्थिती नसतानाही त्याच्याकडे एवढे महागडे फोन आणि कार कशी आली? असा सवाल आमदार प्रवीण तायडे यांनी केला आहे. या प्रकरणाच्याही चौकशीची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे.

अनिरूद्ध दवाळे झी 24 अमरावती : विकृत अयानचे नवनवीन कारनामे समोर येतायत. अयानचा एक व्हिडिओ आता समोर आलाय, या व्हिडिओत त्याच्याजवळ एक महागडी कार आहे, 4 आयफोन आहेत, तसंच पिस्तूल आणि पैशांचं बंडल देखील दिसतंय, त्यामुळे अय्याश अयानचा पाठिराखा कोण असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे. अमरावतीचा नराधम अयानची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे, त्याच्या चौकशीतून दररोज धक्कादायक माहिती समोर येतीय. दरम्यान आता या विकृत अयानचा आणखीन एक कारनामा उघड झाला आहे, आरोपी अयानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, या व्हिडिओमध्ये थार गाडी, आयफोन आणि पैशांचं बंडल त्याच्याजवळ दिसतंय, त्यामुळे अय्याश अयानचा पाठिराखा कोण आहे? असा सवाल आता या व्हिडिओनंतर उपस्थित करण्यात येत आहे.
अयानची परिस्थिती नसतानाही त्याच्याकडे एवढे महागडे फोन आणि कार कशी आली? असा सवाल आमदार प्रवीण तायडे यांनी केला आहे. या प्रकरणाच्याही चौकशीची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. तर दुसरीकडे नराधम अयाननं एका अल्पवयीन मुलीचंही लैंगिक शोषण केलं होतं, दरम्यान पीडितीचा जबाब आता अमरावती पोलिसांनी नोंदवला आहे, या तक्रारीच्या आधारे आरोपीवर पोस्को कायद्यांतर्गत नवा गुन्हा दाखल केला आहे.
अमरावती परतवाडा प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगानं देखील घेतली आहे. तपास अधिका-यांसोबत बोलणं झालं असून या प्रकरणाच्या सखोल तपासाच्या सूचना दिल्याचं विजया रहाटकर यांनी सांगितलं आहे. अमरावती आणि नाशिक प्रकरणात सरकारनं ठोस भूमिका घेतली आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिलं आहे. खरात प्रकरण, नाशिक आयटी कंपनी धर्मांतर प्रकरणाप्रमाणेच आता अमरावती प्रकरणातही दिवसेंदिवस नवनवीन माहिती समोर येत आहे. अमरावतीचा नराधम वयानं लहान असला तरी त्याची कृत्य मात्र भयंकर आहेत, त्यामुळे त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्याची मागणी आता करण्यात येत आहे.
या प्रकरणानंतर अयानच्या सोशल मीडियावरील फॉलोअर्सची संख्या वाढत असल्याचं समोर आलं आहे. गुन्ह्याच्या गंभीरतेपेक्षा सोशल मीडियावरील प्रतिमेला महत्त्व देणाऱ्या एका अजब प्रवृत्तीचे दर्शन सध्या जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. गंभीर गुन्हा दाखल झालेला मुख्य आरोपी अयान अहमद याच्या सोशल मीडियावरील लोकप्रियतेचा आलेख घसरण्याऐवजी चक्क उंचावला आहे. गुन्हा दाखल झाला तेव्हा १८ हजार असलेल्या त्याच्या फॉलोअर्सची संख्या आता २२ हजारांच्या पार गेली असून, या 'डिजिटल क्रेझ'मुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
एकीकडे सोशल मीडियावर आरोपीची चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे उपविभागीय पोलिस अधिकारी आणि एसआयटी (SIT) प्रमुख शुभम कुमार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपासाचा वेग प्रचंड वाढवला आहे. पोलिसांनी आरोपीचे मोबाईल चॅट्स आणि डिजिटल डेटा खंगाळण्यास सुरुवात केली असून, त्यातून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.
मोठ्या अटकेचे संकेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चॅट्समधून आरोपीचे धागेदोरे कोणापर्यंत पोहोचले आहेत, याची स्पष्टता लवकरच होणार आहे. या प्रकरणात केवळ अयानच नाही, तर त्याला पडद्यामागून साथ देणाऱ्या काही बड्या नावांचीही गचांडी धरली जाण्याची शक्यता आहे. एसआयटीच्या या धडाकेबाज कारवाईकडे आता संपूर्ण जिल्ह्याच्या नजरा लागल्या असून, पुढील 48 तास या तपासासाठी अत्यंत निर्णायक मानले जात आहेत.