Pune AC Public Toilet: पुणे महापालिकेने वातानुकुलित (एसी) स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. कामानिमित्त दिवसभर घराबाहेर असलेल्या नागरिकांच्या सोयीसाठी हा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. शहराच्या प्रवेशद्वारांजवळ, तसेच पुणे स्टेशन परिसरात ही एसी स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. याचा उपयोग प्रामुख्याने महिलांना होणार आहे. ही एसी स्वच्छतागृहे कुठे आहेत आणि या ठिकाणी कोणकोणत्या सोयी उपलब्ध असणार आहेत जाणून घेऊयात...
पुण्यात उभारल्या जाणाऱ्या या एसी स्वच्छतागृहांसाठी महापालिकेने प्रस्ताव मागविले आहेत. या स्वच्छतागृहांमध्ये वायफाय, मोबाइल आणि लॅपटॉप चार्जिंग सुविधा असणार आहे. नागरिकांना ठरवीक शुल्क भरून स्वच्छतागृहाचा वापर करता येणार आहे. शहरात दररोज हजारो नागरिक नोकरी, व्यवसायानिमित्त घराबाहेर पडतात. शहरात महापालिकेच्या वतीने अनेक भागांत नागरिकांसाठी स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, त्याची स्वच्छता योग्य पद्धतीने केली जात नसल्याने त्याचा फारसा वापर केला जात नाही.
गेल्या महिन्यात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या एका बैठकीत पुण्यात येणाऱ्या प्रवाशांना अद्यायावत स्वच्छतागृहांची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना दिल्या होत्या. शहराच्या प्रवेशद्वाराजवळ तसेच पुणे स्टेशन परिसरात ही ‘व्हीआयपी’ स्वच्छतागृहे उभारावीत, असेही त्यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने शहरात सात ठिकाणी अद्यायावत आणि वातानुकूलित स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
> चांदणी चौक
> बाणेर
> कात्रज चौक
> शेवाळेवाडी
> वाघोली
> पुणे विमानतळ
> पुणे रेल्वे स्टेशनजवळ