मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी कॉंग्रेस-राष्ट्रवादी सोबत जाणार का ? यावर खलबत सुरु असताना आता त्यांचा मित्रपक्ष एमआयएम देखील सोबत लढेल का ? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडी आणि एमआयमध्ये जागावाटपावरून वितुष्ट आल्याचे समोर येत आहे. कारण एमआयएमला फक्त आठ जागा देण्याची तयारी वंचित बहुजन आघाडीने दाखवल्याची माहीती सुत्रांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित आघाडी आणि एमआयएमच्या आघाडीनं भल्याभल्यांना घाम फोडला. इतकंच नाही तर औरंगाबादच्या रुपानं एक खासदारसुद्धा त्यांना मिळाला, या आघाडीनं राज्यात अनेक ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीची धुळधाण उडवली, मात्र हीच आघाडी आता तुटल्यात जमा आहे, कारण एमआयएमनं वंचित बहुजन आघाडीला सुरुवातीला 100 जागांची मागणी केली होती, त्यानंतर ही मागणी 75 वर आली त्यानंतर अगदी 50वरही एमआयएम तयार झाली, मात्र आंबेडकरांनी या सगळ्यांच मागण्यांना केराची टोपली दाखवली आहे.



गेल्या निवडणुकीत 24 जागांवर एमआयएम लढले होते.  त्यात आठ जागांवर लढणे एमआयएमला शक्यच नाही. किमान 50 तरी जागा हव्यात असा त्यांचा दावा असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळते. त्यामुळे आता हे दोन्ही पक्ष कदाचित वेगळे निवडणूक लढणार असे चित्र दिसत आहे. दरम्यान याबाबत आम्हाला काहीच माहिती नसल्याची प्रतिक्रिया एमआयएम खासदार आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिली आहे.