भविष्यात काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र? सुशीलकुमार शिंदेंना पवारांकडून थेट प्रत्यूत्तर
`भविष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र येतील`, सुशीलकुमारांचं भाकीत
विकास भदाणे, झी २४ तास, जळगाव : काँग्रेस आणि राष्ट्रवादी थकल्याच्या सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याशी राष्ट्रवादीचा संबंध नसल्याचं शरद परवारांनी सांगितलंय. आपण सगळीकडे फिरतो, आपल्या पक्षाची स्थिती आपल्याला माहिती आहे. त्यामुळे शिंदेंच्या विधानाला अर्थ नसल्याचं पवारांनी स्पष्ट केलंय. जळगाव जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या एकाही नेत्यानं पक्षांतर न केल्याचं सांगत पवारांनी कौतुक केलं. ते जळगावमध्ये बोलत होते.
'भविष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र येतील', असं भाकीत नुकतंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केलं सोलापुरात केलं होतं. राष्ट्रवादीचे उमेदवार मनोहर सपाटे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासाठी ते आले होते. यानंतर, 'विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या २० जागा आणि राष्ट्रवादीच्या २० जागा येतील. दोन्ही पक्षाच्या मिळून ४० जागा आल्या तर शरद पवारांना राज्यसभेवर पाठवायचं असेल, तर दोन्ही पक्षांना विलिनीकरणाशिवाय कोणताही पर्याय नसेल' असं वक्तव्य भाजपा खासदार संजय काकडे यांनी केलं.
याविषयी, शरद पवार यांना प्रतिक्रिया विचारली असता शिंदेच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंध नसल्याचं पवार यांनी म्हटलंय.