करमाळ्यात दोन गटांत मतदान केंद्रात हाणामारी
दहिवली इथल्या मतदान केंद्रात घुसून काही जणांना मारहाण करण्यात आलीय
सचिन कसबे, झी २४ तास, करमाळा, सोलापूर : आज विधानसभा निवडणूक २०१९ साठी मतदान सुरू असतानाच सोलापुरात लोकशाहीला धक्का लावणारी एक घटना घडलीय. दहिवली इथल्या मतदान केंद्रात घुसून काही जणांना मारहाण करण्यात आलीय. यामुळे मतदानाला गालबोट लागलंय.
मतदानाच्या दिवशीच मतदान केंद्रावरच राजकीय कार्यकर्ते एकमेकांना भिडलेले दिसले. राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार संजय शिंदे आणि अपक्ष उमेदवार नारायण पाटील यांचे हे कार्यकर्ते होते. मतदान केंद्रावर या दोन गटात काही कारणानं वाद झाला आणि ही हाणामारी सुरू झाली.
या घटनेत नारायण पाटील यांच्या गटातील काही कार्यकर्त्यांना जबर दुखापतही झालेली दिसतेय. मारहाण करणाऱ्या संजय शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर ३०७ चा गुन्हा दाखल करा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा आमदार नारायण पाटील यांनी दिलाय.
करमाळा विधानसभा मतदार संघात युतीच्या उमेदवार रश्मी बागल विरुद्ध संजय शिंदे विरुद्ध नारायण पाटील असा तिहेरी सामना रंगलाय.
२०१४ मध्ये शिवसेनेचे नारायण पाटील या लढतीत विजय ठरले होते. दुसऱ्या क्रमांकाचं मताधिक्य राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांना मिळालं होतं. अवघ्या २५० मतांनी रश्मी बागल यांना गेल्या वर्षी पराभव स्वीकाराव लागला होता. तर तिसऱ्या क्रमांकावर संजय शिंदे होते. संजय शिंदे हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवत होते. त्यांचा जवळपास २००० मतं कमी पडली होती.
मारहाण करणाऱ्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर ३०७ चा गुन्हा दाखल करा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा आमदार नारायण पाटील यांनी दिलाय.