अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती: किसान रेल्वे योजना सुरु केल्याबद्दल रविवारी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. आता राज्याच्या इतर भागांतूनही किसान रेल्वे सुरु करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. किसान रेल ही चांगली संकल्पना आहे. त्यामुळे अगदी  ९०% नाही पण किमान १०% तरी फायदा हा शेतकऱ्यांना होईल. त्यामुळे मी केंद्र सरकारचे आभार मानतो. यासोबतच मराठवाडा, विदर्भ,पश्चिम महाराष्ट्र ,आणि कोकण या भागांतूनही एक एक किसान रेल्वे सरकारने सुरू करावी, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली. जर प्रत्येक भागातून अशी रेल्वे सुरू झाली तर शेतकऱ्यांना देशांतर्गत बाजारपेठ उपलब्ध होईल, असे बच्चू कडू यांनी म्हटले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकऱ्यांच्या शेतमालाची राज्य व राज्यबाहेर विक्री करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने देशातील पहिली किसान रेल्वे दोन दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आली. महाराष्ट्र ते बिहार राज्यापर्यत रेल्वे सुरू झाली आहे. नाशिकमधून सुरू झालेल्या या किसान रेल्वेमुळे शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक सोपी होणार आहे. 


चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात कृषी आणि नाशवंत उत्पादनांच्या पुरवठा करण्यासाठी किसान रेल्वेची घोषणा करण्यात आली होती. या घोषणेनुसार राज्यातील देवळाली ते दानापूरपर्यंतची पहिली किसान पार्सलगाडी सुरु झाली आहे. भुसावळ रेल्वे मंडळ विभागातून ही गाडी सुरु करण्यात आली.

मध्य रेल्वेचा भुसावळ विभाग हा प्रामुख्याने कृषी आधारित क्षेत्र आहे. त्यात प्रामुख्याने जिथे भाजीपाला,कांदा, फळे, फुले आणि व इतर कृषी उत्पादनांची मोठ्या प्रमाणात उत्पादकता आहे.  याची पाटणा, अलाहाबाद, कटनी  येथे या उत्पादनांना मोठी मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना किसान रेल्वेच्या माध्यमातून  चांगला बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे अनेकांनी कौतुक केले आहे.