`5 वर्षात आमका तोंड दाखयक येवक नाय तशे..`; केसरकरांविरोधात बॅनरबाजी; BJP कनेक्शन चर्चेत
BJP vs Eknath Shinde Shiv Sena Faction: या बॅनर्सवर अस्सल मालवणी भाषेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटातील मंत्र्याला टोला लगावण्यात आलेला. संपूर्ण तालुक्यामध्ये हे बॅनर्स झळकले होते. या प्रकरणामध्ये पोलिसांनी तातडीने कारवाई केली.
BJP vs Eknath Shinde Shiv Sena Faction: शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीदरम्यान अनेकदा वेगवेगळ्या गोष्टींवरुन वाद झाल्याचं दिसून आलं आहे. आता पुन्हा या दोघांमधील बेबनाव जाहीरपणे समोर आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झळकलेल्या एका पोस्टरमुळे दोघांमधील वाद सध्या चर्चेत आला असून हे पोस्टर्स भाजपाकडून लावण्यात आल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे.
नक्की झालं काय?
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना निवृत्तीचा सल्ला दणारे बॅनर्स बुधवारी वेंगुर्ल्यात झळकले. केवळ शहरातच नाही तर संपूर्ण तालुक्यात ठिकठिकाणी हे बॅनर्स झळकल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. पोलिसांनी तातडीने हे बॅनर्स हटवले. मात्र तोपर्यंत या बॅनर्सचे फोटो आणि चर्चा संपूर्ण तालुक्यात पसरली. या प्रकरणावर केसरकरांनीही प्रतिक्रिया नोंदवताना, आपण विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केल्याने इच्छुक 'टिल्लू-पिल्लू' घाबरलेत, असं म्हटलं. वेंगुर्ला तालुक्यातील म्हापण, भोगवे आणि परूळे भागामध्ये झळकले हे बॅनर्स कोणी लावले याची ठोस माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र या बॅनर्सवर मालवणी भाषेतून केसरकरांना टोला लगावण्यात आलेला.
काय मजकूर होता या बॅनर्सवर
या बॅनर्सवर अस्सल मालवणी भाषेत, "भाई आता खराच पुरे झाला, थांबा आता...!! 5 वर्षात जसा आमका तोंड धाखवक नाय तसे हेच्या पुढे येव नकात आता कोपरापासून हात सोडून सांगतवं तुमका.." असं लिहिलेलं होतं. तर अन्य एका बॅनवर, "मागच्या निवडणुकीत 2 हजार पोरा-पोरींना नोकरी देतालास असा सांगितलं, 5 वर्षांत एकाही माणसाक नोकरी काय लागाक नाय, पण असले एक एक गजाली सांगून आमची मता मात्र घेतलास," असा टोला लगावला आहे. "तुम्ही हाऊसबोट, वॉटर स्पोर्ट्स त्याचबरोबर स्थानिकांना हॉटेल, पालक अनुदान पर्यटनातून रोजगार अशा गोष्टी सांगितल्या होत्या. आम्ही खुश झालो होतो. त्यानंतर मतं घातली, परंतु तुमची हाऊस बोट काय आमच्या दर्यात पोचाक नाय," असं वाक्यही बॅनरवर होतं.
बॅनर्सवरील मजकूर जसाच्या तसा
म्हापण, पाट-परुळे, भोगवे, चिपी ही गावांची नावा आठवतत काय ओ? कशी आठावतीत? 5 वर्षा सरली तुमका हय येवन. इसारल्या असताल्यात. आमीय इसारललो तुमी आमचे 15 वर्षा आमदार आसास ते.
मागच्या निवडणुकीत इल्लास तेव्हा आमच्च्या दोन एक हजार बेरोजगार पोरा-पोरींचे बायोडाटा घेवचो मोठो कार्यक्रम केल्लास. तेंका चिपीच्या ईमानतळार नोकरे लायतलास म्हणुन सांगलास. 5 वर्षात एकाकय नोकरी काय गावाक नाय पण असले येकयेक गजाली सांगुन आमची मता मात्र घेतलास.
तेच्या आधी पर्यटनमंत्री म्हणान हाऊसबोटी, वॉटरस्पोर्टसब, स्थानिकांका हॉटेला घालुक अनुदान, पर्यटनांतसुन रोजगार असले गजाल्यो मारल्यात. आम्ही खुष झाल्लो, मता घातली. पण तुमचे हाऊसबोटी काय आमच्या दर्यात पोचाक नाय.
आमच्या शेजारचा मालवण मात्र ह्याच गोष्टीनी विकसित झाला, पर्यटनात जगाच्या नकाशार लागला. आमी मात्र सगळा आसान थयच रवलो. तुमचे गजाली आयकत. आणि आजुनय तुमका संधी व्हयी म्हणतास??
भाई, 5 वर्षात जसा आमका तोंड दाखयक येवक नाय तशे हेच्या पुढेय येव नकात. आता कोपरापासुन हात जोडुन सांगतव तुमका... भाई, आता खराच पुरे झाला,थांबा आता, असा मजकूर मालवणी भाषेतून यावर लिहिण्यात आला आहे.
या बॅनर्समागे कोण?
केसरकर यांनी थेट नाव न घेता या प्रकरणाचं खापर महायुतीमधील नेत्यांवरच फोडलं. मात्र हे असले प्रयत्न यशस्वी होणार नाही असंही केसरकर म्हणाले. केसरकरांच्या बोलण्याचा रोख हा भाजपाचे विधानसभा निवडणूक क्षेत्र प्रमुख तसेच माजी आमदार राजन तेलींच्या दिशेने असल्याची जिल्ह्यात चर्चा आहे. केसरकरांनी मागील निवडणूक तेलींविरोधातच लढवून जिंकली होती. केसरकर 15 हजार मतांनी जिंकले होते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपा दावा करत असल्याने विधानसभेसाठीही भाजपाच्या स्थानिक नेत्यांकडून अशाप्रकारचं राजकारण सुरु असल्याने शिंदे गटामध्ये नाराजीचं चित्र दिसत आहे.