तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : महाराष्ट्रात होळीच्या आधी आणि नंतरच्या काही दिवसांमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये जत्रा आणि यात्रांचे दिवस सुरू होतात. गावंच्या गावं चाकरमान्यांनी खुलून जातात. शहरांकडे गेलेली पावलं या दिवसांमध्ये आपोआपच गावच्या दिशेनं वळतात. अतिशय खेळीमेळीच्या आणि आनंदाच्या या दिवसांना निमित्त ठरतं ते म्हणजे गावच्या ग्रामदेतवांच्या यात्रा आणि पालख्यांचं. अशीच एक आकर्षणाचा आणि कुतूहलाचा विषय असणारी लोकप्रिय यात्रा म्हणजे साताऱ्याच्या बावधनची 'बगाड यात्रा'.
'अगंबाई अरेच्चा!' या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेली हीच ती 'बगाड यात्रा'. कैक वर्षांची परंपरा असणाऱ्या या यात्रेसाठी आजवर पंचक्रोशीतील आणि नजीकच्या शहरातील अनेक मंडळी आवर्जून हजेरी लावतात. चित्रपटानंतर तर, या यात्रेची लोकप्रियता अगदी झपाट्यानं वाढली. अशी ही यात्रा यंदासुद्धा रंगपंचमीच्या दिवशी बावधन इथं पार पडली. यावेळी मानाचा बगाड्या म्हणून अजित ननावरे यांची निवड झाली होती. भैरवनाथ महाराजांना विधिवत कौल लावल्यानंतर त्यांना हा मान मिळाला. (Bavdhan Bagad Yatra 2025)
'नाथ साहेबांची सेवा करायला मिळाली याचा आनंद होतोय', अशी प्रतिक्रिया खुद्द ननावरे यांनी झी 24 तासशी संवाद साधताना दिली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या यात्रेची सुरुवात मायपौर्णिमेच्या दिवशी होते. याच दिवशी या बगाडाला लागणारे बांबू तोडले जातात. ते जोडल्यानंतर बगासाठीची लाकडं तोडली जातात. पुढे होळीच्या दिवशी रात्री 12 वाजता देवाला कौल लावला जातो. साधारण 50 लोकांमध्ये हा कौल लागतो आणि एकाच्याच बाजूनं उजवा कौल पडतो. यंदा तो कौल अजित बळवंत ननावरे यांच्या नावानं पडला आणि त्यांना हा बगाड्याचा मान मिळाला.
भैरवनाथाच्या नावानंsss चांगभलंsss; बावधनमध्ये बगाड यात्रेचा उत्साह#Maharashtra #MaharashtraNews #maharashtratourism #satara #bagadyatra #bavdhan pic.twitter.com/VBcFh37k2j
— ZEE २४ तास (@zee24taasnews) March 19, 2025
जवळपास साडेतीनशे वर्षांपासून या यात्रेची परंपरा असून, ही ऐतिहासिक आणि तितकीच पारंपरिक यात्रा ब्रिटीश काळापासून सुरू आहे. दरवर्षी फाल्गुन कृष्णपंचमी अर्थात रंगपंचमीच्या दिवशी या यात्रेचं आयोजन केलं जातं. या यात्रेमध्ये बगाडाला अनन्यसाधारण महत्त्वं.
बगाड म्हणज बैलांनी ओढला जाणारा एक मोठा गाडा. एक असा गाडा ज्याला दगडी चाकं असतात आणि तो अतिशय बळानं ओढला जातो. दगडी चाकं, त्यावर कणा आणि लांब खांबांवर शीड अशी बगाडाची रचना असते. बगाडाच्या शीडाला नवसाच्या बगाड्याला टांगण्यात येतं. ज्यांचा नवस पूर्ण होतो अशाच व्यक्तीला बगाड्याचा मान दिला जातो. पश्चिम महाराष्ट्रातील या अतिशय मानाच्या यात्रेचा उत्साह तब्बल चार दिवस चालतो. यामध्ये पहिल्या दिवशी देवाचं लग्न, दुसऱ्या दिवशी तिखटाचं जेवण, तिसऱ्या दिवशी छबिना आणि शेवटच्या दिवशी बगाड यात्रा निघते. यावेळी गुलालाची मनसोक्त उधळण करत बगाडावर खोबरं उधळत ही यात्रा बगाडासहीत पुढे जाते. बगाड्याचा या यात्रेच्या दिवशी उपवास असून, रात्री ताक पिऊन हा उपवास सोडण्याची प्रथा असल्याचं म्हटलं जातं.