खुर्ची खरेदीत भ्रष्टाचाराचा आरोप : 4 हजारांच्या खुर्चीची 19 हजारांना खरेदी
खुर्ची खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याची चर्चा
विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : सध्या बीड जिल्ह्यामध्ये खुर्ची खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. अंबेजोगाई येथील मुकुंदराज सभागृह नूतनीकरणावर कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी करण्याचा आरोप नगरसेवकांनी केलाय. याची रीतसर तक्रार त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. तसेच याप्रकरणी सखोल चौकशी करून तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे. यामध्ये शासनाच्या जीईएम पोर्टलवर चार हजार 700 रुपये किंमत असलेली खुर्ची 19 हजार 900 रुपयांनी खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या सभागृहांमध्ये 477 खुर्च्या बसवण्यात आलेल्या आहेत. चार हजार 700 रुपयांची खुर्ची 19900 रुपयांना लावल्यामुळे यामध्ये घोटाळा झाल्याचं नगरसेवकांनी म्हटलंय. याची चौकशी करून उधळपट्टी करणाऱ्या संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे
महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण ठोक तरतुदी योजनेनुसार 2018 19 अंतर्गत आंबेजोगाई नगर परिषदेत तीन कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. या निधीपैकी 1 कोटी 50 लाख रुपये तर विकास कामावर तर 1कोटी 50 लाख हे नगर परिषदेच्या मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहाच्या नुतनीकरणासाठी वापरण्याचे प्रस्तावित करण्यात आलं.
नगराध्यक्ष रचना मोदी, विद्यमान नगरसेवक तथा गटनेते राज किशोर पापा मोदी, मुख्याधिकारी सुधाकर जगताप नगरपरिषद अभियंता आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी संगनमत करून हे प्रकरण मार्गी लावलं.
सभागृहामध्ये बनवण्यासाठी पुष्पक खुर्ची ही जी एम पोर्टलवर उपलब्ध असताना तसेच उत्पादन कंपनीकडे 4700 रुपये उपलब्ध करताना ती 19900 रुपये प्रमाणे खरेदी केली.
त्यासाठी खोटे बनावट व बेकायदेशीर अभिलेख तयार करून खोटे कागदपत्र तयार करून कोणत्याही प्रकारची तांत्रिक मान्यता न घेता नूतनीकरणाच्या कामास सुरुवात करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाच्या कोट्यावधी रुपयांच्या रकमेचा अपहार आणि घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आलाय.
या प्रकरणाची सविस्तर तक्रार ही नगरसेवक शेख रहीम रजाक आणि सारंग पुजारी या दोन नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून कार्यवाही करण्याचे मागणी करण्यात आली आहे.
नगरसेवक सारंग पुजारी सांगतात दीड कोटीचा निधी हा मुकुंदराज सभागृह याच्या नूतनीकरणासाठी वापरण्यात आला. खुर्च्या बसवण्यात आलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तफावत दिसत आहे.
सभागृहात बसवलेली खुर्ची जीएम पोर्टलवर उपलब्ध असताना तसेच उत्पादन कंपनीकडे 4700 रुपयाला ती उपलब्ध असताना 19900 रुपये नुसार त्याची खरेदी करण्यात आलेली आहे.
या दीड कोटी रुपयांमध्ये एका नवीन सभागृहात बांधून झाला असतं त्यामुळे याची सखोल चौकशी करून दोषींवर ती कार्यवाही करण्याची मागणी नगरसेवक सारंग पुजारी यांनी केलीये.