)
Beed Crime News: आणखी एका धक्कादायक घटनेने बीड हादरले आहे. शेतीच्या वादातून थरकाप उडवणारी घटना समोर आली असून नेकनुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अंजनवती गावात भावकीतील चार जणांनी एका महिलेला निर्दयीपणे मारहाण करून तिचे पाय तोडण्याचा प्रयत्न केला आहे. अश्विनी येडे असं या महिलेचे नाव आहे.
आरोपींच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेली पीडिता आश्विनी येडे यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे आरोपीकडून याआधीही तीन महिलांवर अशाच पद्धतीने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. इतर महिलेला मारहाण करतानाचा थरारक व्हिडिओ देखील समोर आला आहे.
महिलांना अमानुष मारहाण करतानाचा हा व्हिडिओ तीन महिन्यापूर्वीचा आहे. बीड जिल्ह्यातील या घटनेने पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. तर या प्रकरणाचा नेकनूर पोलीस अधिक तपास करत आहेत. या विकृत प्रकरणामुळे पीडिता आणि कुटुंब मोठ्या दहशतीत असून संबंधित आरोपींवर कडक कारवाई करून आरोपींना जेरबंद करा अशी मागणी केली आहे.
मावळातील देहूरोडमध्ये मेंढपाळ महिलेला बेदम मारहाण
मावळातील देहूरोडमध्ये मेंढपाळ महिलेला बेदम मारहाण. लष्कराच्या मैदानात मेंढ्या चारत असताना किरकोळ वादातून तरुणाने महिलेला लाथा-बुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मारहाण झालेल्या महिलेचं नाव अनाबाई राहुल पांडुळे, तर आरोपीचं नाव लक्ष्मण गुरु असं आहे. अनाबाई दरवर्षीप्रमाणे यावर्षीही देहूरोडमधील दत्त मंदिर परिसरातील लष्करी मैदानात आपल्या मेंढ्या चारत होत्या. त्याच वेळी आरोपी लक्ष्मण गुरूनं “तुमच्या मेंढ्या इथून काढा, त्या मूत्रविसर्जन करतात आणि आमच्या म्हशी चारा खात नाहीत” असं म्हणत वाद सुरू केला.
अनाबाई यांनी “ही जागा तुमच्या मालकीची आहे का?” असा प्रश्न विचारताच आरोपीने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. काठीने मारहाण करत त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झालं, तसेच लाथा-बुक्क्यांनी त्यांच्या पायावरही जबर मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर देहूरोड पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपी लक्ष्मण गुरूला अटक केली आहे. ही घटना तीन दिवसांपूर्वीची असून, परिसरात या घटनेमुळे संतापाचे वातावरण आहे.