Aamir Khan Meet Santosh Deshmukh Son: बीड जिल्ह्यामधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 105 दिवस पूर्ण झाले आहेत. या प्रकरणामध्ये अनेक आरोपींना अटक करुन खटला सुरु असला तरी या प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक असलेला कृष्णा आंधळे अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. या प्रकरणामुळे राज्यातील राजकारणाबरोबरच सामाजिक क्षेत्र ढवळून निघालेलं असतानाच आता दिवगंत संतोष देशमुखांच्या मुलाची अभिनेता आमिर खानने भेट घेतली आहे. पुण्यात ही भेट झाली. या भेटीदरम्यान आमिर खान भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
पुण्यात बालवाडी स्टेडियम येथे पाणी फाऊंडेशन च्या कार्यक्रमात अमिर खानने संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुख यांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळेस संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखसुद्धा विराजसोबत होते. आमिरने या दोघांचंही सांत्वन केलं. या भेटीदरम्यान आमिर खानने धनंजय देशमुख यांच्याकडून संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाची माहिती जाणून घेतली. सर्व घटनाक्रम ऐकून घेतल्यानंतर आमिर खान भाऊक झाला होता. त्यानंतर आमिरने सरपंच संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुख याला कडाडून मिठी मारली. या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.
आमिरची पूर्वाश्रमीची पत्नी तसेच चित्रपट दिग्दर्शिका किरण राव यांनी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांना, 'हिंमत कायम ठेवा' असा सल्ला दिला. त्यावर आमिरनेही, 'होय' असं म्हणत किरण यांच्या सल्ल्याशी आपण सहमत असल्याचं दर्शवलं
सध्या मस्साजोग गावात आमिर खानच्या नेतृत्वाखालील 'पाणी' फाउंडेशन आणि अभिनेते नाना पाटेकर तसेच मकरंद अनासपुरे यांच्या नेतृत्वाखालील 'नाम' फाउंडेशनच्या माध्यमातून नदी खोलीकरणाचे काम सुरू आहे. मस्साजोग गाव पाणीदार करण्यासाठी 'नाम' आणि 'पाणी' फाउंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असतानाच या गावातील तरुणांसाठी उभा राहणारा संतोष देशमुखसारख्या हुशार आणि कष्टाळू सरपंचाबरोबर काय काय घडलं हे ऐकून आमिरही अस्वस्थ झाल्याचं बालेवडीतील भेटीदरम्यान दिसून आलं.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 20 मार्च रोजी 100 दिवस पूर्ण झाले. या शंभर दिवसांमध्ये अनेक घडामोडी घडल्या, त्यात प्रामुख्याने 31 डिसेंबर रोजी मुख्य आरोपी वाल्मिक कराडला अटक करण्यात आल्यानंतर काही आठवड्यांनंतर वाल्मिकबरोबरची राजकीय जवळीक मंत्री धनंजय मुंडे यांना महागात पडली आणि त्यांना मंत्रीपदापासून दूर जावे लागले.
> 9 डिसेंबर 2024 रोजी केज तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या घटनेने मराठवाड्यासह महाराष्ट्र हादरला.
> 13 डिसेंबर रोजी देशमुख हत्या प्रकरणात सर्वात आधी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली.
> देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात पाहायला मिळाले.
> घटनेत धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याचे नाव समोर आले.
> अखेर 31 डिसेंबर रोजी वाल्मीक कराड पुण्यात सीआयडीला शरण गेला.
> केज तालुक्यातील मसाजोग परिसरात असणाऱ्या आवाद एनर्जी प्रकल्प अधिकाऱ्याकडून दोन कोटी रुपयांच्या खंडणीमुळेच सरपंच देशमुख यांची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले.
> दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी सरपंच संतोष अडसर ठरत होते. त्यामुळे सुदर्शन घुलेच्या साथीदाराने देशमुख यांचे अपहरण करून हत्या केली.
> याच वाल्मीक कराडमुळे धनंजय मुंडे यांना मंत्रीपदापासून दूर जावे लागले. 4 मार्च रोजी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला.
> या प्रकरणात शंभर दिवस होऊनही कृष्णा आंधळे फरार आहे. तपास यंत्रणेला तो अद्यापही सापडलेला नाही. त्यामुळे तो आकाशात लपला की पाताळात हा प्रश्न निर्माण झालाय. देशमुख हत्या प्रकरणाचा खटला आता बीड न्यायालयात चालणार असून याची सुनावणी 28 मार्च रोजी होणार आहे.
> देशमुख हत्या प्रकरणात 8 आरोपी विरोधात गुन्हा दाखल असून सात आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. त्यातील कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. मात्र वारंवार उल्लेख करण्यात येत असलेला मास्टरमाईंड मात्र अद्यापही मिळालेला नाही. त्यामुळेच देशमुख कुटुंब आजही न्यायाच्या प्रतीक्षेत कायम आहे.
> शंभर दिवसात न्यायाची लढाई जिंकताना सर्वांचे योगदान खूप मोठे आणि न विसरणारे होते, अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिलेली.